Vita Sangli Murder Case 
सांगली

Vita Sangli Murder Case | प्रेमविवाहाचा करुण अंत! विट्यात पहाटेच्या सुमारास पत्नीची हत्या; चिमुकल्याला मित्राकडे सोडून पती पसार

Vita Sangli Murder Case | किरकोळ वादावादीतून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना विटा येथे घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

विटा : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ वादावादीतून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना विटा येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून संशयित पती अविनाश तुकाराम लोटके हा फरार झाला आहे. याप्रकरणी मृत काजलची मावशी दीपाली शशिकांत साठे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश लोटके याचा विवाह दीपाली साठे यांची भाची काजल हिच्याशी चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता. हा प्रेमविवाह होता. काजलची आई मुंबईत राहत असल्याने काजल लहानपणापासून मावशी दीपाली साठे यांच्याकडेच राहत होती. लग्नानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा अविनाश आणि काजल हे अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पहाटे अविनाशने "पत्नी काजल मला न सांगता कुठेतरी बाहेर गेली आहे" असे सांगत आपल्या मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे तीन वर्षांचा मुलगा ठेवला आणि तो निघून गेला.

बराच वेळ उलटूनही अविनाश परत न आल्याने रोहित त्याच्या घरी गेला. घराच्या खिडकीतून पाहिले असता घरात फरशीवर मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले दिसले.

त्याने ओरडत दार उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र आतून कडी लावलेली होती. त्यानंतर रोहितने घरमालकाशी संपर्क साधून त्यांना बोलावले आणि विटा पोलीस ठाण्यालाही कळवले.

पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली काजल दिसली. तिच्या डोक्यात गंभीर स्वरूपाचे वार केल्याचे आढळले. या प्रकरणी दीपाली साठे यांची विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख कृष्णदेव गडदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. विटा येथील विभागीय फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT