अपघातग्रस्त बस आणि अर्णवी सचिन महाडिक (Pudhari Photo)
सांगली

Karnataka Bus Accident | विटा येथील खासगी आराम बसचा कर्नाटकात भीषण अपघात : सांगलीतील २ ठार, ६ जण जखमी

जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Vita Bus Accident In Karnataka

विटा : विटा येथील खासगी ट्रॅव्हल्स बसला कर्नाटक मध्ये मोठा अपघात झाला असून यामध्ये दोन जण मृत्युमुखी तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात सांगली जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अर्णवी सचिन महाडिक (वय ११, मूळगाव नेवरी, ता. कडेगाव) आणि यश सावंत (वय २०, रा. बस्तवडे, ता. तासगाव) अशी मृतांची नावे आहेत.

समोरून येणाऱ्या भरधाव कार चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात विट्यातील व्यंकटेश्वरा या खासगी आराम बसचा मोठा अपघात झाला. ही घटना कर्नाटकातील मोटेबेन्नूर (जि.हावेरी) गावाजवळ सोमवारी रात्री साडे बाराच्या दरम्यान घडली. याबाबत ब्याडगी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विट्यातील व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स ही खासगी प्रवासी वाहतूक गाडी विटा ते सेलममार्गे कोईमतूर अशी दररोज ये जा करीत असते. काल सोमवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी नेहमीप्रमाणे विट्याहून कोईमतूरकडे ही ट्रॅव्हल्स गाडी निघाली होती. हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूरजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून गाडी जात असताना दुभाजकाच्या एकाच बाजूने समोरून भरधाव वेगाने एक कार आली आणि या कारला चुकवून अपघात टाळण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या चालकाने ब्रेक लावला.

मात्र, गाडी थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. यात अर्णवी संजय महाडिक आणि यश सावंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले. या गाडीमध्ये एकूण ३१ प्रवासी असल्याचे सांग ण्यात आले. या घटनेची ब्याडगी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून हावेरी जिल्ह्या च्या पोलीस अधीक्षिका यशोदा वंतगोडी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी तत्काळ मदत कार्य सुरू केले. जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सचिन महाडिक सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त स्थायिक

या अपघातातील मरण पावलेली अर्णवी ही अकरा वर्षांची लहान मुलगी मूळची कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील आहे. तिचे वडील सचिन महाडिक हे आपल्या पत्नीसह सेलम येथे गलाई व्यवसाया निमित्त स्थायिक आहेत. त्यांना सहा वर्षाची आणखी एक मुलगी आहे. नेवरी येथे सचिन महाडिक यांचे आई-वडील आणि भाऊ राहतात. त्यांची तेथे शेतजमीनही आहे. सचिन महाडिक हे परवाच आपल्या कुटुंबासह नेवरी येथे आले होते. सेलम येथे ते परतत असताना हा अपघात घडला. यात सचिन महाडिक स्वतः, त्यांची पत्नी आणि दुसरी मुलगीही जखमी झाली आहे. काल मध्य रात्री नंतर नेवरी मध्ये ह्या अपघाता बद्दलची माहिती मिळताच सचिन महाडिक यांचे बंधू आणि त्यांची भावजय हे दोघेही कर्नाटकातील मोटेबेन्नूर कडे रवाना झाले आहेत.

यश आपल्या भावाबरोबर गावाकडे आला होता

या अपघातातील दुसरा मृत मुलगा यश खाशाबा सावंत (वय २०,रा. बस्तवडे, ता. तासगाव) हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील खाशाबा सावंत हे मूळचे बस्तवडे ( ता. तासगाव) येथील रहिवासी. सध्या ते पत्नीसह तामिळनाडू मधील सेलम येथे गलाई व्यवसाय निमित्त वास्तव्यास आहेत. यश हा आपल्या भावाबरोबर गावाकडे आला होता. तो वेंकटेश्वरा ट्रॅव्हल्स मधून सेलमला भावाबरोबर परत चालला होता. मात्र वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT