आमदार सुहास बाबर File Photo
सांगली

Suhas Babar : विटा बसस्थानक विमानतळाच्या धर्तीवर होणार आधुनिक

आमदार सुहास बाबर; टेंडर मिळाले नसल्याने विरोधकांची एकतर्फी टीका

पुढारी वृत्तसेवा

विटा : ज्यांना टेंडर मिळाले नाही, त्यांच्या रागातून कदाचित बसस्थानकाच्या कामावर टीका होत असावी. एकतर्फी आरोप खोटे की खरे, हे काम पूर्ण होईल त्या दिवशी जनताच ठरवेल. विटा बस स्थानकात विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सुविधा दिल्या जातील, असे सडेतोड उत्तर आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना दिले.

विटा आगारासाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या पाच नवीन बसेसच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगार प्रमुख उदय पवार, एसटी महामंडळाच्या रचनाकार स्वाती राऊत, जिल्हा परिषद सदस्या शीतल बाबर, सई शिंदे, पंचायत समिती सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

बाबर म्हणाले, येथील नवीन बसस्थानकाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, हे जिल्ह्यात सर्वोत्तम ठरणार आहे. सुमारे अडीच एकर जागेत साकारल्या जाणाऱ्या या बसस्थानकाची मुख्य इमारत १७ हजार स्क्वेअर फूट भव्य आहे. पूर्वीच्या १४ प्लॅटफॉर्मऐजी आता १७ प्रशस्त प्लॅटफॉर्म उभारले जात असून, त्यापैकी ९ प्लॅटफॉर्म या महिनाअखेरीस प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होतील. उर्वरित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. या ठिकाणी प्रवाशांसाठी ‘पिकअप आणि ड्रॉप’ची विशेष व्यवस्था, रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आणि दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग असेल.

सुरक्षेसाठी बसस्थानकाला ९ मीटरचे स्वतंत्र प्रवेश व निर्गमन द्वार उभारले जात असून, दत्त मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात हायवे दर्जाचे काँक्रिटीकरण केले जाणार असल्याने प्रवाशांची खड्ड्यांतून कायमची मुक्तता होईल. उत्पन्नासाठी इमारतीत १६ व्यावसायिक गाळे आणि पहिल्या मजल्यावर दोन मोठे हॉल बांधण्यात आले आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर महिलांसाठी हिरकणी कक्ष, पोलिस चौकी, कर्मचारी विश्रांतीगृह आणि आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून या प्रकल्पासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी मिळाला आहे.

कामाच्या विलंबाबाबत आमदार बाबर म्हणाले की, कामाच्या दर्जाशी तडजोड करता येत नाही, कारण काँक्रिटीकरणासाठी ‘क्युरींग पिरियड’ आवश्यक असतो. २०२१ मध्ये पारदर्शक पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवून ११ जणांमधून हे काम देण्यात आले. त्यामुळे काम न मिळालेल्यांच्या रागातून ही टीका होत असून, जनताच कामाचा दर्जा ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मनीषा बागल, राजाभाऊ शिंदे, उत्तमराव चोथे, उत्तम चोथे, विनोद गुळवणी, महेश घोरपडे, प्रकाश बागल, दिलीप किर्दत यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT