सांगली

Vita News | भाकपचे महासचिव कॉम्रेड डी. राजा यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार २०२६’ जाहीर

पुढारी वृत्तसेवा

विटा : क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार २०२६’ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) महासचिव कॉम्रेड डी. राजा यांना जाहीर करण्यात येत असल्या ची माहिती लोकविद्यापीठाचे कॉम्रेड ॲड. सुभाष पाटील यांनी दिली आहे.

याबाबत ॲड. सुभाष पाटील म्हणाले, भाकपचे महासचिव कॉम्रेड डी. राजा यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. तामिळनाडूतील दलित समाजातून पुढे आलेल्या कॉम्रेड डी. राजा यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेतच 'ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन'च्या माध्यमातून त्यांनी शोषितांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची मुहूर्त मेढ रोवली.

कम्युनिस्ट पक्षाच्या युवक संघटनेतून काम करत त्यांनी कामगार, शेतकरी आणि दलित वर्गाच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. विशेषतः २०१८ मधील दिल्ली सीमा येथील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

२०१९ पासून ते भाकपचे महासचिव म्हणून पुरोगामी विचारधारेचा प्रचार व प्रसार करत आहेत. प्रा.विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाई सुभाष पवार, ॲड. नानासाहेब पाटील आणि ॲड. स्वाती पाटील उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताहाचे औचित्य साधून, येत्या ६ ऑगस्ट रोजी विट्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र आणि रोख रक्कम असे आहे.यापूर्वी आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, भाई एन. डी. पाटील, भाई गणपतराव देशमुख, मृणालताई गोरे, प्रा.आ.ह. साळुंखे, मेधा पाटकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भाई जयंत पाटील, डॉ. विकास आमटे, डॉ. अभय बंग, पत्रकार पी. साईनाथ, कॉम्रेड सीताराम येचुरी, पद्मश्री डॉ. गणेश देवी, कॉम्रेड वृंदा करात, तुषार गांधी आणि कृषितज्ज्ञ जगमोहन सिंह आदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT