विटा : विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात नगरसेवक पदासाठी 78, तर नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. त्यामुळे आजअखेर विटा पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी 5 आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
विटा पालिकेच्या 13 प्रभागातील 26 जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येईल, तसे इच्छुक उमेदवारांनी यंत्रणा गतिमान केली आहे. शनिवारचा मुहूर्त साधत तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून दीपा चोथे आणि काजल म्हेत्रे यांनी, तर भाजपकडून प्रतिभा चोथे आणि ज्योती रोकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना शिंदे गटाच्यावतीने शुक्रवारी एक अर्ज दाखल झाला आहे.
शनिवारी माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सहा ब, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी सात ब, माजी नगराध्यक्षा सुनीता भिंगारदेवे यांनी नऊ अ मधून अर्ज दाखल केले. माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे यांचे पती सचिन शितोळे यांनी दहा ब मधून, तर माजी नगराध्यक्षा मीनाक्षी पाटील यांचे पती सुखदेव पाटील यांनी चार ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे यांनी नऊ ब मधून, विरोधी पक्षाचे नगरसेवक अमर शितोळे यांनी दहा ब, नऊ ब आणि दोन ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केले.
याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपनगराध्यक्षा रूपाली पाटील यांनी पाच ब मधून, रूपाली मेटकरी यांनी एक अ मधून, धर्मेश पाटील यांनी चार ब, वैभव म्हेत्रे यांनी एक ब, भाजपच्या माजी नगरसेविका प्रगती कांबळे यांनी अकरा अ, विनोद पाटील यांनी एक ब, माजी नगरसेविका वैशाली सुतार यांनी चार अ, माजी नगरसेवक फिरोज तांबोळी यांनी सात अ, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश कदम यांनी नऊ ब आणि दोन ब मधून, तर वनीता शितोळे यांनी आठ ब मधून अर्ज दाखल केले. भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी दोन ब आणि सहा ब मधून, माजी विरोधी पक्षनेते, शिवसेना शिंदे गटाचे कृष्णात गायकवाड यांनी आठ अ, माजी नगरसेविका स्वाती भिंगारदेवे यांनी नऊ अ, भाजपच्या नेहा डोंबे यांनी दहा अ मधून, माजी नगरसेवक अरुण गायकवाड यांनी चार ब मधून अर्ज दाखल केला. एकूण 78 जणांनी शनिवारी अर्ज दाखल केले.