विट्यात नमो उद्यान अंतर्गत एक कोटी रूपये खर्चाचे उद्यान उभारणार 
सांगली

Sangli News : विट्यात नमो उद्यान अंतर्गत एक कोटी रूपये खर्चाचे उद्यान उभारणार

पालिकेच्या पहिल्याच सभेत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

विटा : विट्यात नमो उद्यान अंतर्गत एक कोटी रूपये खर्चाचे उद्यान उभारण्याचा निर्णय विटा पालिकेच्या नवीन सदस्यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्ग १६० च्या कामाबाबत सर्व नगरसेवक, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि जनता अशी संयुक्त बैठक लावू ,अशी माहिती उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी दिली आहे.

येथील पालिकेत आज (दि.२३) नवीन पदाधि काऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष तथा गटनेते अमोल बाबर, विरोधी पक्षनेते अॅड. अजित गायकवाड, माजी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यांत खानापूर रस्त्यानजिक वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंर्गत नमो उद्यान उभा करण्याचा ठराव करण्यात आला. यासाठी जवळपास एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वांगीण नागरी विकास साधण्याच्या अनुषंगाने नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची गुणवत्ता, वृध्दी, महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थाना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच अभियान राबविण्याच्या उद्देशाने नगरपालिका क्षेत्रात विविध सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अनुदान म्हणून विटा पालिकेस एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अभियानाअंतर्गत किमान ५० टक्के निधी मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे विटा पालिकेच्या मालकीच्या शाळांचे दर्जोन्नती साठी, महिलांच्या आरोग्याबाबत, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास करण्याच्या उद्देशाने हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला. त्यावर विरोधी नगरसेवक अॅड. सुमित गायकवाड यांनी कराडच्या धर्तीवर विट्यातील नगर पालिका शाळेतून सीबीएससी पॅटर्न राबवण्याची मागणी केली. मात्र, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी त्याअगोदर शाळांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. टप्प्याटप्याने शाळांना सुविधा मिळाल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम राबविता येईल, असे सांगितले. त्यानंतर हा ठराव संमत करण्यात आला.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार निवारा व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्याबाबतचा ठराव मांडण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते अॅड. अजित गायकवाड यांनी यासाठी पालिकेने मागच्या वर्षभरात पाच लाखांवर खर्च केला आहे. तरीही कुत्र्यांचे व्यवस्थापन होत नाही. काही लोक हद्दीबाहेरून कुत्री आपल्याकडे सोडत आहेत. ठेकेदार त्याच त्या कुत्र्यांवर खर्च करीत आहेत का? असा सवाल उपस्थित करीत कुत्र्यांना टॅगींग करण्याची मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी पाटील यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण काम करीत आहोत. त्यासाठी निवारा केंद्र उभारावे लागेल. शहर वाढत असताना ते गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. यासह विविध विषयांवर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष अमोल बाबर, विरोधी पक्षनेते अजित गायकवाड, नंदकुमार पाटील, सुमित गायकवाड, संजय भिंगारदेवे, महेश कदम, प्रतिभा पाटील, विशाल तारळेकर यांनी भाग घेतला. आयत्या वेळच्या विषयात नगरसेवक संजय भिंगारदेवे यांनी रेवानगर येथील मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार सुहास बाबर यांनी निधी दिल्याचे सांगत त्यासाठी ना हरकत दाखला देण्याची मागणी केली. तर नगरसेवक गायकवाड बंधूंनी सध्या चर्चेत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर भूमिका मांडण्याची मागणी केली. त्यावर उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नात कोणी राजकारण करू नये. आपण कौन्सिल सदस्य, नगरपालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अशा संयुक्त बैठकीचे आयोजन करीत आहोत. त्यामध्ये सर्वांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. मात्र, विकास योजना राबविताना राजकारण करण्यापेक्षा एकत्रित निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक गायकवाड यांनी संबंधीत बैठक होईपर्यंत काम थांबवण्याची मागणी केली. त्यावर उपनगराध्यक्ष बाबर यांनी असे काम थांबवण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. मात्र आपण त्यांना तशा सुचना करू, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT