विटा : पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील विट्याजवळील ढवळेश्वर तलावाचे सोडलेले पाणी केवळ राजकीय राजकीय दबावापोटी बंद केले, असा आरोप करत राज्यातील सत्ताधारी भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली टेंभूच्या अधिकाऱ्यांनाच कोंडले. यावेळी आंदोलकांनी सुळेवाडी येथील पाटबंधारेच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.
टेंभू योजनेच्या पाण्याच्या आवर्तनावरून सत्ताधारी महायुतीमधील दोन पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे आमने सामने आल्याचे चित्र खानापूर मतदारसंघात दिसत आहे. विट्याचे उपनगर असलेल्या सुळेवाडी येथे पाटबंधारे विभागाचे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शाखा कार्यालय आहे. आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान, भाजपचे पंकज दबडे आणि संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील काही शेतकरी आणि पक्षाच्या पदाधिकारी घोषणाबाजी करत एकत्र आले. यावेळी टेंभूच्या शाखा कार्यालयाच्या आतकाही कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एकाने त्यांच्याजवळ असलेले कुलूप हातात घेऊन चक्क मुख्य दरवाज्यालाच कुलूप लावले. या अचानक झालेल्या प्रकारामुळे आतील कर्मचारी गांगरून गेले. त्यांत एका महिलेचाही समावेश होता. त्यातच ऑफिस सुटायची वेळ झाली होती, आता कार्यालयासच टाळे ठोकल्याने कर्मचारी आतच अडकून राहिले होते.
तब्बल तासभरानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आक्रमक बनलेल्या आंदोलकांनी कार्यालयाचे कुलूप उघडून अधिकाऱ्यांना मुक्त केले. याबाबत संदीप ठोंबरे म्हणाले की, टेंभू योजनेचे पाणी विट्याजवळील ढवळेश्वर तलावातून पुढे ढवळेश्वर गावाकडे जाते. या दरम्यानच्या ओढ्याच्या पात्रात नऊ बंधारे आहेत. ते ऐन फाईन उन्हाळ्यात कोरडे पडल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यातच आमच्या माहितीनुसार परवा रात्री पाणी सोडण्यात येणार होते. तसे नियमानुसार सोडलेही, परंतु ते शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या सांगण्यावरून बंद करण्यात आले असा आरोपही ठोंबरे यांनी केला.यावेळी ढवळेश्वरचे राहुल मंडले, अजित किर्दत, अभिषेक शिंदे, हणमंत किर्दत, बाळासो पवार, गुरुनाथ किर्दत, स्वप्नील किर्दत, मोहम्मद मुलाणी, विकास कारंडे, प्रशांत कारंडे, अमोल कांबळे, यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, टेंभू योजने च्या खानापूर- तासगाव कालव्यातून ढवळेश्वर तलावाला पाणी येते. तलावात पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर तिथून पुढे पाणी खाली सोडले जाते. आज दुपारी ३२ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. आता पाण्याचे दुसरे आवर्तन सोडायचे होते परंतु खाली पुढे पाणी सोडल्या नंतर सगळे बंधारे भरायचे असतील तर आणखी पाणीसाठा आवश्यक होता. परंतु आमच्या विभागाच्या कालवा निरीक्षिका राजश्री नलवडे यांना अंदाज न आल्यामुळे त्यांनी पाणी सोडले ते परंतु तासाभरातच ते बंद केले,त्यामुळे गैरसमज झाला उद्या गुरुवारी सकाळी पाणी खाली सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, आमदार सुहास बाबर यांना याबाबत विचारले असता, आपल्याला आंदोलनाबद्दल काही माहिती नाही. परंतु आपले अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून ढवळेश्वर चे पाणी उद्या सोडण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.