सांगली

Vita Accident : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला विट्याजवळ भीषण अपघात; ६ जखमी, दोघे गंभीर

अपघातात गाडीचा चुराडा, स्थानिकांची मदतीसाठी धाव

पुढारी वृत्तसेवा

विटा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील सुळेवाडी येथे बुधवारी (दि. २५) दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. देवदर्शन उरकून पुण्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारला झालेल्या या भीषण अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या पलीकडे असलेल्या जाहिरात फलकावर जाऊन धडकली आणि त्यानंतर अनेक पलट्या खात रस्त्याखाली कोसळली. या अपघातात गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील आणि नातेवाईक असलेले सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गौरी नरुटे (वय २१), सुनीता पोपट महानवार (६०), विश्वंभर आप्पासाहेब नरुटे (५२), लक्ष्मी विश्वंभर नरुटे (३८), सविता अण्णा मदने (४०) आणि उषाबाई आप्पासाहेब नरुटे (६०) यांचा समावेश आहे. यातील दोन महिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील काही भाविक एम.एच १४ एम.टी. ०९१८ या क्रमांकाच्या कारमधून आरेवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून विटामार्गे पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची कार सुळेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटलेली कार वेगात महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेली आणि तिथल्या एका मोठ्या जाहिरात फलकाला जोरात धडकली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की, कारने महामार्गावरून खाली कोसळताना अनेक पलट्या घेतल्या. काही क्षणांतच कारचा चक्काचूर झाला.

स्थानिकांची मदतीला धाव

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच सुळेवाडी परिसरातील नागरिक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाडीमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र स्थानिकांनी आणि पोलिसांनी वेळीच मदतकार्य राबवल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT