पलूस ः पलूस व कडेगाव तालुक्यातील माळवाडी, शिवाजीनगर आणि कोयना वसाहतीतील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. प्रकल्पग्रस्त वसाहतीतील अडचणींचा सकारात्मक मार्गाने निपटारा झाला पाहिजे. शासनाच्या यंत्रणेकडून येथे कोणताही अन्याय होऊ नये, याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केल्या.
पलूस तहसील कार्यालय व उपविभाग कडेगाव यांच्यातर्फे पलूस व कडेगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनविषयक अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पलूस कोयना वसाहत, माळवाडी, शिवाजीनगर भागातील नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर डॉ. कदम यांनी सकारात्मक भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठे-जाधव, उपवनसंरक्षक सागर गवते, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सुरेखा सेठीया, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर, गटविकास अधिकारी राजेश कदम उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील अडचणी, भूमिहीनांना घरकुल वाटप, तसेच शासनाच्या 1972 च्या आदेशातील विसंगती यावर बैठकीत चर्चा झाली. माळवाडी शिवाजीनगर येथील नागरिकांनी शासनाच्या नोंदींमध्ये आपले प्लॉट वर्ग 2 म्हणून नोंदले गेले असून त्यामुळे विविध सवलतींपासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार केली. आपले प्लॉट वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून द्यावेत, अशी मागणी केली. अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, शिवाजीनगर भागातील 108 नागरिकांचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करावा. तो शासनाकडे पाठविण्यात येईल. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात येईल.
बैठकीत शिवाजीनगर भागातील प्लॉटवर झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दा मांडण्यात आला. एकूण 443 प्लॉटपैकी 372 चे वाटप झाले असून उर्वरित काही प्लॉटवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भिलवडीचे माजी उपसरपंच मोहन तावदर यांनी केला. या अनियमिततेबाबत अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांच्याकडे तक्रार नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी केली. यावर खांडेकर म्हणाले, या प्रकाराची सखोल चौकशी प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या माध्यमातून करण्यात येईल. दोषींवर कायदेशीर कारवाई करून जागेचे रक्षण करण्यात येईल.
कोयना वसाहतीमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. नागरिकांनी सांगितले की, काही दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांनी सांगितले की, नवीन नळ पाणीपुरवठा योजनेतून कोयना वसाहतीला जोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचण दूर करून लवकरच या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.