कडेगाव शहर : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने उत्तम दर देण्याची परंपरा जोपासली असून यापुढेही शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढे ही परंपरा चालू राहणार आहे. गत वर्षाच्या 2024-25 या गळीत हंगामास कारखान्यास पुरवठा केलेल्या उसाला 3,280 रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत आहे. आतापर्यंत कारखान्याने गळीतास आलेल्या उसाला 3,200 रुपये दर दिला असून आणखी 80 रुपये शेतकर्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. दरम्यान, साखर कारखाना एआय टेक्नॉलॉजीचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वांगी (ता. कडेगाव) येथे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. कदम बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप सूर्यवशी, भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, संचालक रघुनाथराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जयसिंगराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, संचालक पुरुषोत्तम भोसले उपस्थित होते.
आमदार डॉ. कदम म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखान्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. कारखान्याने आतापर्यंत राज्य व देश पातळीवरील 26 पुरस्कार मिळविले आहेत. पुढे ते म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानावर कारखान्याने लक्ष दिले आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार आहे. याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा. तसेच मोठ्या प्रमाणात कारखान्यास आपला ऊस गळीतास पाठवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी अहवाल व नोटीस वाचन केले. या सभेस युवा नेते दिग्विजय कदम, संचालक भीमराव मोहिते, सुरेश थोरात, तानाजीराव शिंदे, सयाजीराव धनवडे, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, युवराज कदम उपस्थित होते. संचालक युवराज कदम यांनी आभार मानले.