कडेगाव : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षितता नियमाबाबत आणि अपघात टाळण्याबाबत जागरुकता निर्माण केली जाणे आवश्यक असल्याचे मत माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. डॉ. विश्वजित कदम यांनी राज्यातील वाढते अपघात या विषयावरील तारांकित प्रश्नाच्यावेळी अनेक बाबी मांडल्या, यावेळी ते बोलत होते.
यावेळी विश्वजित कदम म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात अपघात होत असतात. तेव्हा वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांत बालवयात शालेय अभ्यासक्रमाबरोबरच रस्ता सुरक्षेबाबत व नियमांबाबत जागरुकता निर्माण व्हावी, अपघातग्रस्तांना (गोल्डन अवर सुविधा) वेळीच मदत मिळावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अनुशासनसह देशप्रेम व देशभक्तीची जाणीव होऊन ही भावना जागृत व्हावी, यासाठी गृह विभागाने निर्माण केलेला विशेषतः पोलिस व शिक्षण विभागाचा संयुक्त असा शालेय रस्ता सुरक्षा जागरुकता हा विषय सर्व शाळांमध्ये राबवावा. तसेच स्काऊट गाईडप्रमाणे रस्ता सुरक्षा जागरुकता विषयास सवलतीचे गुण देण्याचा शासनाचा काही मानस आहे का ? असा प्रश्नही डॉ. कदम यांनी यावेळी उपस्थित केला.
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच रस्ता सुरक्षा व नियमाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डॉ. विश्वजित कदम यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले.