सांगली : महायुती शासन हे फसवे शासन आहे. केवळ मोठ्या-मोठ्या घोषणा करण्यात ते पटाईत आहेत. प्रत्यक्षात काही करायचे नाही, मात्र भ्रष्टाचार करून पैसा उकळायचा, हे त्यांना जमते. त्यामुळे मनपा निवडणुकीत यांची जागा दाखवून द्या, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. विश्वजित कदम यांनी केले. प्रभाग क्रमांक 16 च्या प्रचार सभेत ते बोलत होते.
सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 16 मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमवेत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा व प्रचार सभा पार पडली. या पदयात्रेत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कदम म्हणाले की, जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून मनपात महाविकास आघाडी वरचढ ठरेल, असा विश्वास वाटत आहे. हा जनतेचा विश्वास सार्थ ठरवत लोकांना अपेक्षित असणारा पारदर्शी कारभार करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या अडचणी आणि शहरातील समस्या लक्षात घेऊन लोकाभिमुख धोरण राबविण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार नेहमी तुमच्यासोबत राहतील, हा विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो, अशी ग्वाही सांगलीत प्रभाग 16 मध्ये प्रचार सभेदरम्यान त्यांनी दिली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. विशाल पाटील, जितेश कदम, उमेदवार मयूर पाटील, राजेश नाईक, दीप्ती घोडके, सलमा शिकलगार, सागर घोडके, आयुब बारगीर, करीम मेस्त्री आदी उपस्थित होते.