सांगली : निर्यातक्षम शेती उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या सांगलीला जगाच्या बाजारपेठेशी कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी कवलापूरचे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, त्यात कोण खोडा घालतेय? असा सवाल करून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ महत्त्वाचे असून त्याला लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज संसदेत केली.
विशाल पाटील म्हणाले, ‘खूप काळापासून कवलापूर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. सांगली हळद नगरी म्हणून ओळखली जाते. साखर, हळद, डाळिंब, मका, कापड उत्पादनात आमचा भाग आघाडीवर आहे. या भागात देश-विदेशातील अनेक व्यापारी येऊ इच्छितात. कारण, आमची बाजारपेठ खूप मोठी आहे. पण, अडचण अशी आहे की आम्हाला हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी नाही. विमानसेवा नसल्याने अनेक व्यापारी इच्छा असून येथे येऊ शकत नाहीत.”
ते म्हणाले, “आमच्याकडे निर्यातक्षम उत्पादने आहेत. हळद निर्यातीत आम्ही नेहमीच आघाडीवर आहोत. यावर्षी 288 बिलियन यूएस डॉलरच्या हळदीची निर्यात आम्ही केली आहे. हे योगदान महत्त्वाचे आहे. विमानतळ झाल्यास आणखी निर्यात वाढेल, मात्र विमानतळ होऊ नये यासाठी या प्रयत्नात कुणीतरी खीळ घालतो आहे. आमची जागतिक बाजाराशी, देशाशी कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे. इथे अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. देशभरातून मुले येथे शिकायला येतात. पालकांना येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी विमानतळ गरजेचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.