सांगली : मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने उपसमिती स्थापन करावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. यात प्रामुख्याने शैक्षणिक सवलती, वसतिगृह भत्ता, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथी संस्थेमध्ये निधीची कमतरता यामुळे मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख आहे. मराठा समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करण्यासाठी तातडीने मराठा आरक्षण उपसमिती स्थापन करावी आणि या प्रश्नांवर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे.
तोडगा आवश्यक
सर्व्हर डाऊन असल्याने जात पडताळणी तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांच्या अडचणी, मराठा आरक्षणाची न्यायालयात सुरू असलेली सुनावणी, आंदोलने आणि समांतर आरक्षणाअंतर्गत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या यांसारख्या समस्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.