तासगाव : राज्यातील आणि केंद्रातील सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. त्यांना जनतेच्या समस्या, शेतकर्यांचे दुःख यांच्याशी काही देणे-घेणे नाही. निवडणुका आल्या की, केवळ पैसे वाटायचे आणि सत्तेवर येण्यासाठी लोकांना गोंजारायचे, हीच त्यांची नीती आहे, असा हल्लाबोल खासदार विशाल पाटील यांनी बुधवारी तासगाव येथे केला. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी तासगावात लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन करण्यात आले.
खासदार पाटील म्हणाले, शेतकरी वर्षानुवर्षे नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि हमीभावाच्या प्रश्नांनी हैराण आहे. मात्र केंद्र सरकार कधीही ठोस निर्णय घेत नाही. पूर्ण देशभर आंदोलने झाली, अनेक शेतकर्यांनी आपले प्राण गमावले, पण तरीही सरकार ढिम्म राहिले. ते म्हणाले, जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच सरकारला गरिबांची, महिलांची, शेतकर्यांची आठवण येते. मग कुठे सवलती जाहीर होतात, पैसे वाटले जातात आणि आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडणूक संपली की हेच सरकार पाच वर्षे गप्प बसते.
अवकाळी पावसाने शेतकर्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ओल्या ढगांनी पेरणीपासून हंगामापर्यंत सर्व श्रम वाहून नेले. शेतकर्यांच्या घरात दुःखाचे सावट दाटून आले आहे. अशा बिकट परिस्थितीत सत्ताधार्यांनी इशारा सभा घ्यायच्याऐवजी शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी केली आहे.
आ. पाटील म्हणाले, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे माझ्या कानावर आहे. हे म्हणजे शेतकर्याच्या खिशातून पैसे काढून शेतकर्यालाच मदत करायची असाच प्रकार आहे. जर जनतेचे अश्रू पुसण्यात शासन अपयशी ठरले, तर येत्या निवडणुकांत जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील, शीतल हाक्के, अभिजित पाटील, रवींद्र पाटील तसेच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.