कवठेमहांकाळ : माजी खासदार संजय पाटील व त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी येथील पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. Pudhari File Photo
सांगली

कवठेमहांकाळला राडा

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीला शुक्रवारी हिंसक वळण लागले. आमदार सुमन पाटील आणि माजी खासदार संजय पाटील गटामध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्या फिर्यादीनुसार माजी खासदार संजय पाटील यांच्यासह चार ते पाचजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. माजी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही पदाधिकार्‍यांविरोधात तक्रारी दाखल करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

संजय पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांच्या घरी जाऊन मारहाण केल्याचा आरोप सुमन पाटील व रोहित पाटील यांनी सकाळी केला. दुपारनंतर माजी खासदार संजय पाटील यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना, गुरुवारी सायंकाळी स्वीय सहायक खंडू होवाळे याला अय्याज मुल्ला, दादासाहेब कोळेकर आणि बाळासाहेब पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. संजय पाटील व त्यांच्या समर्थकांनी येथील माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला (वय 48, रा. दादा चौक, कवठेमहांकाळ) यांना घरात घुसून शुक्रवारी मारहाण केली. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. संशयितांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली. मुल्ला यांच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली, अशी तक्रार मुल्ला यांनी पोलिसात दिली आहे.

दरम्यान, आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी माजी खासदार पाटील व त्यांच्या समर्थकांवर कारवाईची मागणी करीत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी माजी खासदार संजय पाटील, त्यांचे स्वीय सहायक खंडू होवाळे यांच्यासह अन्य अनोळखी चार ते पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. सकाळी फिरून आल्यानंतर मुल्ला घरासमोर बसले होते. त्यावेळी संजय पाटील यांचे पीए खंडू होवाळे आले. त्यांनी मुल्ला यांना, संजय पाटील भेटायला येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात दोन-तीन गाड्या येऊन थांबल्या. गाडीमधून संजय पाटील यांच्यासह दहा-पंधराजण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेला त्यांचा मुलगा कैफ, पुतण्या एजाज व त्यांची आई हाजराबी यांनाही मारहाण केल्याचे मुल्ला यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दादासाहेब कोळेकर, बाळासाहेब पाटील यांनाही धमकी

बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनाही माजी खासदार संजय पाटील यांनी फोनवरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माजी खासदारांकडून आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे, आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दादासाहेब कोळेकर व बाळासाहेब पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.

नगराध्यक्ष निवडीचे कारण

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी मदत करीत असल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. मुल्ला हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते आहेत.

कार्यकर्ते आमने-सामने, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यामुळे आमदार सुमन पाटील व रोहित पाटील तातडीने कवठेमहांकाळला आले. त्यांनी समर्थकांसह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. मारहाण करणार्‍यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिस ठाण्याबाहेर रोहित बोलत उभे होते. त्यावेळी संजय पाटील समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयासमोर असलेल्या कार्यालयातून चालत जुन्या बसस्थानकापर्यंत आले. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. ते समर्थक कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्याकडे येतील, अशी शंका होती. परंतु, ते गाडीमध्ये बसून जुन्या बसस्थानकावरून निघून गेले. त्यांनी शहरात मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर समर्थक तक्रार दाखल करण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन, समर्थक भिडून अनर्थ होणार नाही, याची काळजी घेतली. दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर आमने-सामने आले होते. यावेळी पोलिसांनी सतर्कता बाळगली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT