जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटातील मतदान प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उमेदवार विनोद पवार यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. मतदारांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला असून, सुमारे १५ ते २० मतदारांनी उमेदवारांसमोर उघडपणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकाराबाबत सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवून योग्य ती मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान प्रक्रियेबाबत बोलताना विनोद पवार म्हणाले, मतदान जवळपास पूर्ण झाले होते. सुरुवातीच्या ५० ते ५५ मतदानांपैकी सुमारे १० ते १५ मतदारांनी उमेदवारांसमोरच आपले मतदान उघडपणे केल्याचे आम्ही पाहिले. आमचे दोन-तीन प्रतिनिधी आणि समोरचे उमेदवारही तेथे उपस्थित असताना हा प्रकार घडला. त्यामुळे गुप्त मतदानाचा नेमका उद्देश काय राहिला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंदाजे १५ ते २० मतदारांनी अशा पद्धतीने मतदान केल्याचे दिसून आले. तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनाही दबावामुळे आपले मतदान दाखवावे लागल्याची परिस्थिती होती, असे त्यांनी सांगितले.
मतदानाच्या पहिल्या तासातच मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानासाठी आल्यानंतर त्यांच्याकडून मतदान दाखवून घेण्यावरून वाद आणि आक्षेप घेतले जात होते. एका मतदारानंतर दुसऱ्या मतदाराच्या मतदानावर आक्षेप, पुन्हा तिसऱ्या-चौथ्या मतदाराबाबत गोंधळ, अशा प्रकारे पहिला तास गेला. आपल्या गटातील मतदारांनी मात्र शांततेत कोणताही गोंधळ न करता मतदान केले. विरोधी गटातील मतदारांबाबत वेगळी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले. मतदारांना आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. मतदान गुप्त पद्धतीने होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मतदारांवर दबावाचे वातावरण निर्माण झाले.