सांगली : पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते. ब्रिटिशांच्या बाजूने भारतीय सैन्यही या जागतिक लढाईत उतरले होते. पश्चिम आघाडी, मध्य-पूर्व, पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, इजिप्त आदी आघाड्यांवर भारतीय सैनिक मर्दुमकी गाजवत होते. सुमारे तेरा लाख भारतीय सैन्याने या महायुद्धात भाग घेतला होता. महाराष्ट्रातील, सांगली जिल्ह्यातील सैनिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. विदेशी रणभूमीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, असा घोष उमटत होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावातील शंभरावर तरुण रणभूमीवर पराक्रमाची शर्थ करत होते. त्यातूनच वीर योध्द्यांचे गाव म्हणून रांजणीची ओळख अधिक गडद झाली.
आज 28 जुलै. 28 जुलै 1914 रोजी पहिले महायुद्ध सुरू झाले. केंद्रीय शक्ती आणि मित्रराष्ट्रे या दोन गटात जगाची विभागणी झाली होती. ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, तुर्कस्थान आदी राष्ट्रांच्या केंद्रीय शक्तींविरोधात ब्रिटन, फ्रान्स, इटली, रशिया, अमेरिका आदी दोस्तराष्ट्रांमधील संघर्षाची परिणती जागतिक महायुद्धात झाली. त्यावेळी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. साहजिक भारत या युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने उतरला होता. पहिल्या महायुद्धात रांजणी या गावातील शंभरावर सैनिक सहभागी झाले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देत या सैनिकांनी विदेशी रणभूमीवर मोठा पराक्रम केला. ब्रिटिश सैन्याने मेसोपोटोमियामध्ये (आजच्या इराकजवळील टायग्रीस व युफ्रेटिस नद्यांमधील भाग) तुर्की सैन्याचा पराभव केला. ब्रिटिश सैन्याची ही महत्त्वाची युद्धमोहीम होती. ब्रिटिश सैन्यात भारतीय सैन्यही होते. या युद्धात रांजणीचे यशवंतराव संतराम भोसले यांनी मोठे शौर्य गाजवले.
पहिल्या जागतिक महायुद्धात रांजणीचे बळवंत यशवंत भोसले, गणपती ज्ञानू भोसले, पितांबर तात्या देसाई, राजाराम बाबाजी सूर्यवंशी यांना वीरगती प्राप्त झाली. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवलेले यशवंतराव संतराम भोसले पुढे सुभेदार मेजर या पदावरून निवृत्त झाले. गव्हर्नरचे एडीसी तसेच एक्स्ट्रा असिस्टंट रुक्रुटिंग ऑफिसर, सांगली म्हणूनही कर्तव्य बजावले. पुढे 1 जानेवारी 1943 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांनी यशवंतराव भोसले यांना ‘रावसाहेब’ ही पदवी प्रदान करून व्यक्तिगत सन्मान केला. यशवंतराव भोसले यांच्या पत्नी पुतळाबाई यशवंतराव भोसले यांनी युद्धावेळी सैन्यात भरतीसाठी अनेकांना उद्युक्त केले. त्यामुळे अनेक तरुण सैन्यात दाखल झाले. या कार्याची दखल घेऊन 1 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश सरकारने पुतळाबाई भोसले यांचा ‘रिक्रुटिंग फॉर मेडल’ देऊन सन्मान केला.
यशवंतराव भोसले हे सांगली संस्थानमध्ये पोलिस अधिकारीही होते. 1932 मध्ये रांजणी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले. त्यामध्ये सुभेदार मेजर (नि.) यशवंतराव भोसले, शामराव भोसले, कृष्णराव भोसले, नानासाहेब भोसले, रावजी पाटील, हरी भोसले, शंकरराव कुलकर्णी, धोंडी पाटील, शंकर कोळी, नारायण कुलकर्णी, सदाशिव सगरे, रावजी चौगुले, गंगाराम मेंडगुळे यांचा पुढाकार होता.
मोठ्या संख्येने होते. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत झाले. इंग्लंड, अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, पोलंड आदी दोस्तराष्ट्रे आणि जर्मनी, इटली, जपान, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया आदी अक्ष राष्ट्रे यांच्यात हे युद्ध झाले. या महायुद्धातही ब्रिटिशांच्या म्हणजे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने भारतीय सैन्य लढले. या युद्धातही रांजणीच्या जवान सैनिकांनी परकीय युध्दभूमीवर आगेकूच करत पराक्रम गाजवला. ज्ञानेश्वर रामचंद्र भोसले, भगवान आप्पाण्णा भोसले, शंकर ज्ञानू भोसले, लक्ष्मण सखाराम माने, रामराव यशवंत भोसले, तुकाराम कृष्णा पवार, सखाराम सूर्याबा सोनूर, वसंत बंडा भोसले, सखाराम ज्ञानू चव्हाण, सखाराम विठोबा पवार, निवृत्ती विठोबा पवार, बापू पवार हे रणभूमी गाजवत असताना शहीद झाले.
पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक लढाईत मर्दुमकी गाजवलेले जवान ज्या मातीत जन्मले, ती माती किती पावन, पुण्यवान असेल..! कवठेमहांकाळ तालुका हा सैनिकांचा तालुका मानला जातो. प्रत्येक गावाला गौरवशाली सैनिकी परंपरा आहे. दहशतवाद्यांविरोधातील चकमक असो अगर मोठे युद्ध, प्रत्येकवेळी इथल्या सैनिकांनी अपूर्व शौर्य गाजवले. तालुक्यात सध्या सहा हजारावर माजी सैनिक आहेत. या माजी सैनिकांनी पूर्वायुष्यात म्हणजे सैन्य दलात असताना कोणत्या ना कोणत्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. अपूर्ण साहस, पराक्रम दाखवून दिलेला आहे.
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात आहेत. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ते अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत.