जत : उमदी (ता. जत) येथील विकास मलकारी टकले या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणात केवळ दोन आरोपींना अटक करून चालणार नाही, तर यातील मुख्य सूत्रधार आणि इतर संशयितांनाही तत्काळ बेड्या ठोकाव्यात, या मागणीसाठी मृत विकासची आई आणि नातेवाईकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 7 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
18 डिसेंबररोजी जत येथील जनावरांच्या बाजार आवारात विकास टकले यांचा खून झाला होता. याप्रकरणी रवींद्र बंडगर आणि विराज पांढरे यांना अटक केली आहे. मात्र, मृत विकासची आई प्रीताबाई टकले, नातेवाईक सुमन बंडगर, लक्ष्मी कुलाळ यांच्या मते, हा खून पूर्वनियोजित असून यामध्ये अनेकजण सामील आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी यापूर्वीही विकासला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी एकाने विकासला दुचाकीवर बसवून जत येथे आणले आणि त्यानंतर कट रचून त्याची हत्या केली. हे सर्व संशयित मुख्य आरोपींचे निकटवर्तीय असून त्यांचा थेट सहभाग असल्याचा संशय विकास यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
आईचा टाहो
उपोषणास बसलेल्या आई प्रीताबाई टकले यांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली. ‘माझ्या मुलाचा जीव गेला, आम्हालाही मारून टाका, पण न्याय नाकारू नका,‘ असा टाहो त्यांनी फोडला. या कटात सामील सव; गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.