सांगली : जतचे विजय ताड… भाजपचे माजी नगरसेवक… दि. 17 मार्च 2023 रोजी 'सुपारी' देऊन भरदिवसा त्यांच्याच लहान चिमुरड्यासमोर धडाधड गोळ्या झाडून हत्या केली. हत्या करणारे तीन 'शूटर्स' 24 तासात पोलिसांच्या गळाला लागले. पण सुपारी देणारा माजी नगरसेवक उमेश सावंत दहा महिन्यांपासून फरार आहे. अजूनही तो पोलिसांना सापडत नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.
जत-सांगोला राष्ट्रीय महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर दुपारी दोन वाजता ताड यांची हत्या झाली. ते मुलांना शाळेत आणण्यास गेले होते. त्यावेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने जिल्हा हादरला होता. गोळ्या झाडणारे तीन 'शूटर्स' अलगद सापडले. तब्बल 75 लाख रुपयांची 'सुपारी' देऊन ताड यांची हत्या केल्याची माहिती तपासातून पुढे आली. पण यासंदर्भात ठोस पुरावे मिळाले नाहीत. ताड यांच्या खुनाचे ठोस कारणही पोलिसांच्या तपासातून पुढे आलेच नाही. हत्या करण्यासाठी 'सुपारी' कुठे फुटली, ही बाबही समोर आली नाही.
घटनास्थळी गोळ्या झाडलेल्या तीन पुंगळ्या सापडल्या होत्या. तीन गोळ्या… त्याही अगदी जवळून घातल्याने ताड काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांची तडफड सुरू होती. त्यावेळी 'शूटर्स'नी दगडाने त्यांचे डोके ठेचले. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतरच 'शूटर्स'नी पलायन केले. ताड रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्यांची लवकर ओळखही पटली नव्हती.
हत्येच्या घटनेनंतर ताड यांच्या नातेवाईकांनी सावंत यांच्यावर संशय व्यक्त केला.'शूटर्स'च्या चौकशीतूनच त्यांचे नाव पुढे आले. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच सावंत पसार झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तब्बल दोन महिने त्याच्या शोधासाठी जत तालुक्यात मुक्काम ठोकून होते. तरीही तो सापडला नाही. तो गेला तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या अटकेसाठी मृत ताड कुटुंबाने सांगलीत आंदोलनही केले. अजूनही तो जत पोलिसांना सापडत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सावंत याच्यासह त्याच्या तीन शूटर्सविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायदाही लावण्यात आला. ताड यांच्या हत्येच्या प्रकरणात 'शूटर्स'सह सावंतविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 'मोक्कां'तर्गत कायद्यासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मिळाली नाही.
अटकेत असलेला बबलू चव्हाण याने ताड यांची हत्या करण्यासाठी 'सुपारी' घेतल्याचे तपासातून पुढे आले होते. ताड यांची हत्या करण्यापूर्वी दीड महिना त्याने स्वत:चा मोबाईल बंद ठेवला होता. यावरून ताड यांची हत्या पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले होते.
घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला होता. पण त्यावेळी हा मोबाईल 'फ्लाईट' मोडवर होता. पोलिसांनी 'फ्लाईट' मोड काढल्यानंतर हा मोबाईल अटकेत असलेल्या आकाश व्हनखंडे याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. जरी पोलिसांनी आपल्याला पकडले तरी लोकेशन मिळू नये, यासाठी त्याने मोबाईल 'फ्लाईट' मोडवर ठेवल्याचे निष्पन्न झाले होते.