विटा : सांगली जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद आता थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी भाजपच्या विजयी उमेदवार माधवी पडळकर यांच्याविरोधात विटा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा पराभव आपल्याला मान्य नसून लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नाही, असा आरोप करत, हुकूमशाही पद्धतीने प्रशासन आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा मोटे यांनी केला आहे.
निंबवडे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या विद्या मोटे विरुद्ध भाजपच्या माधवी पडळकर यांच्यात निवडणूक लढत झाली होती. यात पडळकर यांनी मोटे यांचा 980 मतांनी पराभव केला. याबाबत विद्या मोटे म्हणाल्या, ही निवडणूक लोकशाही मार्गाने न होता हुकूमशाही पद्धतीने झाली. निवडणुकीच्या काळात मतदारांमध्ये दहशत माजवण्यात आली होती. लोकांच्या डोक्यावर बंदुका आणि गळ्यावर तलवारी ठेवून त्यांना धमकावण्यात आले, तसेच काहींना मारहाणही करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झालेली नाही. याबाबत आपण प्रशासन आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली गेली नाही. निवडणुकीत जे गुन्हे आणि अमानुष छळ झाला, त्याचे सर्व पुरावे याचिकेसोबत न्यायालयात सादर केले असल्याचेही मोटे यांनी म्हंटले आहे.
माधवी पडळकर या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत. विद्या मोटे या सहायक आयकर आयुक्त सचिन मोटे यांच्या पत्नी आहेत. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.