सांगली : जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने व सेस रद्द केल्याने वाहनांच्या विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ शक्य आहे. कराचा दर कमी झाल्याने ग्राहकांचे कार खरेदीत 60 हजार ते 2 लाख रुपये वाचणार आहेत. हा ग्राहकांना दिलासा आहे. नवीन कररचनेची अंमलबजावणी दि. 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नवरात्री ते दिवाळी हा कालावधी वाहन उद्योगात विक्रीचे नवे उच्चांक गाठेल, असे संकेत आहेत.
जीएसटीचे सहा स्लॅब होते. त्यामध्ये 0.125 टक्के, 3 टक्के, 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के यांचा समावेश होता. याशिवाय आरामदायी वाहनांवर सेस होता. दरम्यान, जीएसटी कौन्सिलने 12 टक्के, 28 टक्के हे जीएसटीचे दोन स्लॅब आणि सेस रद्द केला आहे. आता 0.125 टक्के, 3 टक्के, 5 टक्के, 18 टक्के आणि 40 टक्के हे जीएसटीचे स्लॅब राहिले आहेत.
दुचाकी वाहनांना 28 टक्के जीएसटी होता, तो आता 18 टक्के असेल. कर 10 टक्के कमी झाल्याने दुचाकी खरेदी करू इच्छिणार्यांना हा मोठा दिलासा आहे. बाराशे सीसी इंजिन क्षमता असलेली लहान पेट्रोल कार, जिची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे, अशा कारला 28 टक्के जीएसटी व 1 टक्का कॉम्पेन्सेशन टॅक्स होता. आता या 29 टक्के कराऐवजी केवळ 18 टक्के जीएसटी लागणार आहे. पंधराशे सीसी क्षमतेच्या लहान डिझेल कारला 28 टक्के जीएसटी व 3 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स होता. आता 18 टक्के जीएसटी असेल. तब्बल 13 टक्के सवलत मिळाली आहे.
बाराशे सीसी क्षमतेवरील मध्यम आकाराच्या पेट्रोल कारवर 28 टक्के जीएसटी आणि 15 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स होता. या एकूण 43 टक्के कराऐवजी आता 40 टक्के जीएसटी झाला आहे. 3 टक्के सवलत मिळाली आहे. पंधराशे सीसीवरील व चार मीटर लांबीवरील लक्झरी कारवर 28 टक्के जीएसटी आणि 20 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स होता. या 48 टक्के कराऐवजी आता 40 टक्के जीएसटी भरावा लागेल. म्हणजे 8 टक्के सवलत मिळाली आहे. पंधराशे सीसीवरील व चार मीटर लांबीवरील एसयुव्ही (स्पेशल युटिलिटी व्हेईकल) कारवर 28 टक्के जीएसटी व 22 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स होता. आता या 50 टक्के कराऐवजी 40 टक्के जीएसटी भरावा लागेल. म्हणजे 10 टक्के कर कमी झाला आहे. आरामदायी कारवर 3 टक्के ते 10 टक्के कर कमी झाला आहे. मध्यम व लहान श्रेणीतील कारवर 11 ते 13 टक्के कर कमी झाला आहे.
1500 सीसी क्षमतेच्या आतील व 4 मीटर लांबीच्या आतील डिझेल कारच्या खरेदी खर्चात ग्राहकांचे 1 लाख ते 1.50 लाख रुपये वाचतील. 1200 सीसी क्षमतेच्या आतील व चार मीटर लांबीच्या आतील पेट्रोल कारच्या खरेदी खर्चात 60 हजार ते 1 लाख रुपये बचत होईल. 1500 सीसी क्षमतेवरील आरामदायी कारच्या खरेदीवर ग्राहकांचे 1.50 लाख ते 2 लाख रुपये वाचतील. जीएसटी कमी झाल्याने वाहन विक्रीत वाढ होईल.- सतीश पाटील, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, माई ह्युंदाई.
ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी; सुटे भाग होणार स्वस्त
ट्रॅक्टरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. ट्रॅक्टरच्या सुट्या भागांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. ट्रॅक्टरचा टायर आणि ट्युबवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्केपर्यंत खाली आणला आहे. ट्रॅक्टर वगळता अन्य वाहनांच्या सुट्या भागांवर 28 टक्के जीएसटी होता, तो आता 18 टक्के करण्यात आला आहे.