सांगली : सांगली जिल्ह्यातील १३ वर्षांच्या निष्पाप वेदांत बंडगर या मुलाला गोळी मारून ठार करण्यात आले. यातील मुख्य आरोपीने जत भागातही गोळीबार केला होता. त्याचवेळी जर पोलिसांनी त्याला अटक केली असती तर त्या निष्पाप मुलाचा जीव वाचला असता.
मात्र, सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने जत पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाला फोन करून ‘गुन्हा दाखल करू नका, हे प्रकरण मिटवून टाका’ असा दबाव आणला होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात केला.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सांगली आणि जत परिसरातील या घटनांचा संदर्भ देत त्यांनी गृह विभागाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला.
आ. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात जत येथील गुंड नीलेश गडदे याच्याकडून झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, जतमध्ये जेव्हा पहिल्यांदा गोळीबार झाला, तेव्हाच पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, राजकीय दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचाच परिणाम पुढे एका निष्पाप बालकाचा जीव जाण्यात झाला.
हे संपूर्ण प्रकरण जर 'सीआयडी'कडे वर्ग केले, तर पोलिसांवर दबाव आणणारे आणि या पापात सहभागी असणारे सर्व सत्ताधारी नेते उघडे पडतील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. या गंभीर आरोपामुळे विधिमंडळात मोठी खळबळ उडाली.