सांगली : गुंड म्हमद्या ऊर्फ महम्मद जमाल नदाफ (वय ४४, रा. संजयनगर) याचे नाव समोर आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला अटक केली. त्याने गुंड नीलेश गडदे याला खुनासाठी पाठबळ व प्रोत्साहन दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वेदांत बंडगर याच्या खूनप्रकरणी मुख्य सूत्रधार नीलेश गडदेसह संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेला सागर चौगुले हा नजरकैदेत आहे. गडदेला पिस्तूल पुरवणार्या मलिक शेख (रा. मिरज) याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांची नावे समोर आली आहेत.
आरगमधील रेल्वे मालधक्क्यावरील कामावरून गुंड नीलेश गडदे व लक्ष्मण खरात यांच्यात वाद झाला. वादातून गडदे याने खरातच्या घरात जाऊन कुटुंबाला धमकावले. त्याचे पडसाद उमटल्यानंतर जत पोलिस ठाण्यासमोर गडदेच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे याला हमाल नेते बाळासाहेब बंडगर कारणीभूत असल्याच्या रागातून त्यांना मारण्यासाठी सांगली गाठली. बंडगर बंगल्यात नव्हते. अंगणात मोबाइल पाहत बसलेला त्यांचा नातू वेदांतवर गोळी झाडून खून केला.
निष्पाप वेदांतच्या खूनप्रकरणी संतप्त पडसाद उमटत आहेत. ही घटना गांभीर्याने घेत अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे हा तपास सोपवला. तपासात गुंड म्हमद्या नदाफ याचे नाव पुढे आले. त्याने गडदे याला या गुन्ह्यात पाठबळ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.