Vedant bandgar murder case 
सांगली

Vedant Bandgar murder case: फरार संशयित किरण लोखंडेला अटक

कामगार नेते दत्ता पाटोळे खून प्रकरणातही होता सहभाग

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : संजयनगर येथे झालेल्या १४ वर्षीय वेदांत बंडगर याच्या निर्घृण हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार संशयित किरण शंकर लोखंडे (वय ३६, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) याला पोलिसांनी कवठेमहांकाळ येथे सापळा रचून अटक केली आहे.

११ जून रोजी झालेल्या या हत्याकांडात लोखंडेचा थेट सहभाग होता. वेदांत बंडगर याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली जात असताना तो मुख्य सूत्रधार नीलेश गडदे याच्यासोबत घटनास्थळावर प्रत्यक्ष उपस्थित होता. या गुन्ह्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. पोलिस त्याचा गांभीर्याने आणि कसून शोध घेत होते.

अटक करण्यात आलेला किरण लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगलीत खळबळ उडवून देणाऱ्या कामगार नेते दत्ता पाटोळे यांच्या खून प्रकरणातही त्याचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय काही दिवसांपूर्वीच बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मारामारी, धमकावणे अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. लोखंडे कवठेमहांकाळ परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने वेगाने हालचाली करून त्याला बेड्या ठोकल्या. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार नीलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश घागरे, कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ यांना अटक केली आहे. किरण लोखंडेच्या या अटकेमुळे आता या गुन्ह्यातील अंतर्गत धागेदोरे, गुन्ह्याचा कट, शस्त्र पुरवठ्याबाबतचे मोठे खुलासे पोलिसांसमोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT