वारणा, कृष्णा नदीकाठ धास्तावला..! 
सांगली

Sangli Rain : वारणा, कृष्णा नदीकाठ धास्तावला..!

दोन्ही नद्या पात्राबाहेर; नागरिकांचे स्थलांतर सुरू; प्रशासन हाय अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : वारणा, कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, धुवाधार पाऊस, यामुळे वारणा, कृष्णा नद्यांना पूर आला आहे. वाळवा तालुक्यात नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. जुनेखेड, गौडवाडी, हुबालवाडी, बहे, बनेवाडी येथील 220 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ताकारी पुलाजवळ पाण्याने धोका पातळी ओलांडली आहे. महापुराच्या भीतीने वारणा, कृष्णा नदीकाठ धास्तावला आहे.

कोयना धरणातून 95 हजार 300 क्युसेक व वारणा धारणातून 39 हजार 663 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दोन दिवसापासून वारणा, कृष्णा नदी पातळीत झपाट्याने वाढ होत आहेत. पाणी पातळी आणखी वाढली, तर कणेगाव, भरतवाडी गावात पाणी शिरण्याचा धोका आहे. कृष्णा नदीवरील बहे, बोरगाव, नागठाणे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ताकारी येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वारणा नदीवरील चिकुर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेल्याने दोन दिवसापासून वाहतूक बंद आहे. भरतवाडीत रस्त्यावर पाणी आले आहे. जुनेखेड येथील आरोग्य उपकेंद्र पाण्याखाली गेले आहे. तांबवे, शिरटे, बिचूद, रेठरेहरणाक्ष येथील स्मशानभूमीत पाण्यात आहे. बहे पुलाजवळ पाणी पातळी 19 फूट 6 इंचावर आहे. तेथील धोका पातळी 23 फूट 7 इंच आहे. ताकारी पुलाजवळ पाण्याने धोका पातळी ओलांडली आहे. सायंकाळपर्यंत तेथील पाणी पातळी 51 फूट 6 इंचापर्यंत पोहचली होती. बुधवारी जुनेखेड येथील 17, गौडवाडी येथील 2, बहे येथील 22, हुबालवाडी येथील 8, बनेवाडी येथील तीन कुटुंबातील 220 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. नागठाणे येथील 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. रस्त्यावर पाणी आल्याने भरतवाडी गावचा संपर्क तुटला आहे.

वारणा नदीकाठच्या ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, भरतवाडी, तांदुळवाडी, कणेगाव आदी गावांत शेतीत पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. कृष्णा नदीकाठच्या नरसिंहपूर, शिरटे, बिचुद, रेठरेहरणाक्ष, ताकारी, गौडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, तांबवे, धोत्रेवाडी, बहे, वाळवा भागात नदीकाठची शेती पाण्याखाली आहे. वस्त्यांवरील जनावरांचे स्थलांतर सुरू आहे. महापुराच्या भीतीने कृष्णा, वारणाकाठ हबकला आहे.

पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी केली जात आहे. नागरिकांच्या स्थलांतरासाठी शाळा, मंगल कार्यालये उपलब्ध केली आहेत. प्रशासन पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
डॉ. आबासाहेब पवार गटविकास अधिकारी, वाळवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT