मिरज : पुढारी वृत्तसेवा
हुबळी-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची आज (गुरुवारी) ट्रायल रन होणार आहे. यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी ते मिरजपर्यंत धावणार आहे. व मिरजेतूनच ती हुबळीसाठी पुन्हा रवाना करण्यात येणार आहे. दि. 15 पासून ही एक्स्प्रेस नियमित धावणार आहे. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसची ही ट्रायल रन घेण्यात येत आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. सोमवार व्यतिरिक्त अन्य सर्व दिवशी ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे मिरज पुन्हा फास्टट्रॅकवर आले आहे.
हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसची आज चाचणी पार पडणार आहे. यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस मिरजपर्यंत सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी 10 वाजून 30 हुबळी स्थानकावरून सुटेल. 10 वाजून 48 मिनिटांनी धारवाड स्थानकावर येईल. 12 वाजून 20 मिनिटांनी बेळगाव स्थानकावर येईल. तर दुपारी 3 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस मिरज स्थानकावर येईल. परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मिरज स्थानकातून सुटेल. दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी बेळगाव स्थानकावर पोहोचेल. रात्री 7 वाजून 8 मिनिटांनी धारवाड स्थानकावर पोहोचेल. तर 7 वाजून 50 मिनिटांनी वंदे भारत एक्स्प्रेस हुबळी स्थानकावर पोहोचेल.
दक्षिण पश्चिम रेल्वेकडून हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असली तरी त्याची ट्रायल केवळ मिरजपर्यंत पार पडणार आहे. मिरजेत वंदे भारत एक्स्प्रेसचे विविध प्रवासी संघटनाकडून जोरदार स्वागत करण्यात येईल. यानंतर ही वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा हुबळीकडे रवाना होईल. देशभरामध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत असताना पश्चिम महाराष्ट्र मात्र वंदे भारत एक्स्प्रेसपासून वंचित होता. पश्चिम महाराष्ट्रात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची विविध प्रवासी संघटनांसह प्रवाशांची मागणी होती. त्याला रेल्वेकडून देखील प्रतिसाद मिळाला असून, हुबळी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. त्यामुळे मिरज रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्यांना लाभ होणार आहे.
हुबळी-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर-मिरज-पुणे अशी धावणार आहे. तर परतीच्या प्रवासात मात्र ही एक्स्प्रेस पुणे-मिरज-हुबळी अशी धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसपासून कोल्हापूर वंचित राहिल्याने रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु कोल्हापूरकरांना एकाच मार्गे या वंदे भारत एक्स्प्रेसचा लाभ होणार आहे.