सांगली ः रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत आदित्य हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाची मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या काचा, काऊंटर, खिडक्या फोडल्या. संगणक, प्रिंटरही फोडले. यावेळी रुग्णालयामधील कर्मचार्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी दुुपारी पावणेएकच्या सुमारास घडला.
पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ हा धुडगूस सुरू होता. विश्रामबाग पोलिसांनी धाव घेत वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह 17 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर मार्तंड माने, सविता शंकर माने, सिद्धनाथ मार्तंड माने, आकाश शिवाजी लोंढे, संतोष कुमार वनखडे, रेश्मा संतोष वनखडे, राखी प्रदीप शिंदे, (सर्व रा. कवठेमहांकाळ), सूरज वसंत काळे, संजय यल्लाप्पा सनदी (रा. बोरगाव), बिरुदेव महादेव करडे (रा. वाल्मिकी आवास, सांगली), पारगोंडा रायगोंडा पाटील (रा. अनंतपूर, ता. अथणी), विशाल मनोहर कांबळे (रा. मिरज), शबाना मशाद पटेल (रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ), उज्ज्वला राजाराम धोत्रे (रा. अंजनी, ता. तासगाव), संजना भानुदास आठवले (रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ), दीपाली राजू सोनवणे (रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ), छाया खंडू कांबळे (रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) अशी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
विश्रामबाग चौकात पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर डॉ. शरद सावंत यांचे आदित्य हॉस्पिटल आहे. जिल्ह्यातून रुग्ण या रुग्णालयात येतात. विविध शासकीय योजना व कामगार योजनेतून रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालय प्रशासनाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते, कामगार योजनेतून उपचारास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वंचित आघाडीकडे आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दुपारी वंचित आघाडीचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन, घोषणाबाजी करत रुग्णालयामध्ये घुसले. त्यांनी तळमजल्यावरील औषध दुकान व स्वागत कक्षाच्या काचा फोडल्या. संगणक तोडले. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील काचा फोडल्या. काही कर्मचार्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही धक्काबुक्की करीत मारहाण करण्यात आली. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ हा धुडगूस सुरू होता. या तोडफोडीत रुग्णालयाचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन करणार्या वंचित आघाडीच्या 17 जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रुग्णालयातील डॉ. सुनील लक्ष्मण माने यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव होता. दरम्यान, रुग्णालय आणि आंदोलकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सामान्य रुग्णांना योजना नाकारणार्या तसेच त्यांच्याकडून जादा पैसे घेणार्यांवर कारवाई करून रुग्णालय बंद करण्याची मागणी वंचित आघाडीने केली.
आदित्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीचा आणि रुग्णालय कर्मचार्यांवर झालेल्या हल्ल्याचा सांगली वैद्यकीय शाखेकडून (आयएमए) निषेध करण्यात आला. रुग्णालय हे रुग्णसेवेचे पवित्र ठिकाण आहे. येथे अहोरात्र सेवेमध्ये असणार्या डॉक्टरांवर, परिचारिकांवर किंवा रुग्णालयाच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा तोडफोड करणे, हे अमानवी कृत्य आहे. अशा घटनांमुळे वैद्यकीय कर्मचार्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांनी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, वैद्यकीय संस्थांना आणि डॉक्टरांना पोलिस संरक्षण दिले जावे, अशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली.
माझ्या पंचवीस वर्षांच्या सेवेमध्ये कोणत्याही रुग्णाकडून योजनांमध्ये सांगून एकही रुपया घेतलेला नाही. रुग्णालयाबाबत एकही तक्रार नाही. आजचा हल्ला हा पूर्वनियोजित होता. पैसे उकळण्याचा व खंडणी मागण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन चौकशी करावी व या हल्ल्यामागच्या सूत्रधारांवरही कठोर कारवाई करावी.डॉ. शरद सावंत, संचालक, आदित्य हॉस्पिटल