ढोंगी बाबा File Photo
सांगली

Fraud godmen : पुरोगामी, तरी भोंदूंचे कारनामे!

वाळवा तालुक्यातील चित्र; पीडितांचे शोषण

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात भोंदूंच्या कारनाम्याला ऊत आला आहे. निवडणुकीत तर भोंदूंच्या अनेक काळ्या लीला चव्हाट्यावर येत आहेत. राजकीय करिअरच्या आमिषाने, पैशाच्या हव्यासापोटी, आर्थिक परिस्थितीने, आजारपणाने पिचलेले लोक भोंदूंना बळी पडत आहेत. दरबार भरवून भोंदूकडून अनेकांचे आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

वाळवा पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जातो. लोक चळवळींना कायम तालुक्याने बळ दिले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भोंदूंच्या लीलाही वाढू लागल्या आहेत. लग्नाच्या समस्या, जुनाट आजारपण, आर्थिक समस्या, करणी, भूतबाधा, कौटुंबिक वाद आदी समस्या दूर करतो, असा विश्वास देऊन भोंदू दरबार भरवत आहेत. यासाठी वेगळी प्रचार यंत्रणा राबविली गेली आहे. समस्यांनी ग्रासलेली कुटुंबे भोंदूंकडे चकरा मारत आहेत. देवऋषीपणाच्या नावावर अंगारे, दोरा-गंडे देऊन पीडित कुटुंबांना गिऱ्हाईक बनवले जात आहे. त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. भोंदूंकडून महिलांना शरीरसुखाची मागणी झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. भूतबाधा, करणी काढण्यासाठी आर्थिक पॅकेज ठरवले जाते, तर कोंबडी, बोकडांच्या बळीसाठी भोंदूकडून अवाच्या सवा मागणी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. वारणा पट्ट्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक येथील स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहेत. चिकुर्डे येथील स्मशानभूमीत तर कापडामध्ये बाहुल्या, नारळ, लिंबू, मुलींचे फोटो व त्यामध्ये दाबण घुसवून ठेवल्याचे समोर आले होते. चिठ्ठ्यांमध्ये मुलींची नावे लिहिली होती.

बुवाबाजीची मालिकाच...

ढवळी येथे अमावास्या, पौर्णिमेला दरबार भरवून, जिवंत नाग पूजल्याचा प्रकार घडला होता. वन विभागाने या नागाची सुटका करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला. कामेरी येथे दरबार भरवून अलौकिक शक्तीद्वारे भूतबाधा काढणे, आजार बरे करणे, करणी काढणे आदी प्रकारचे दावे करून बुवाबाजीने लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भांडाफोड केला होता. एक महिला आणि तिच्या दोघा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पैसे दुप्पट करून देतो; पैशाचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवून कापूरवाडी येथील व्यावसायिकाला पाच लाख रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी बुलडाणा, नाशिक जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले होते. तरीही बुवाबाजीला तालुक्यातील नागरिक बळी पडत आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. मानसिक, शारीरिक काही प्रकरणात लैंगिक शोषणदेखील होत आहे. नागरिकांनी जागरूक होऊन याच्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT