Hutatma Sugar Factory Protest 
सांगली

Hutatma Factory Protest| बैठकीतील गोंधळ घडवून आणलेला : वैभव नायकवडी

आंदोलकांच्या आडून गुंड प्रवृत्तीचे लोक घुसवले

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याची मासिक बैठक ही जाणीवपूर्वक घडवून आणलेला गोंधळ असल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केला. आंदोलकांच्या नावाने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मुद्दाम गोळा करण्यात आले होते. बैठक सुरू होऊ द्यायचीच नाही, असा त्यांचा पूर्वनियोजित उद्देश होता. यामुळेच बैठकीतून बाहेर पडलो, अशी माहिती त्यांनी दिली.

मासिक बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत वैभव नायकवडी बोलत होते. ते म्हणाले, आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असा काही जणांचा हट्ट होता. मात्र, अजेंड्यानुसार सभेपुढील सर्व विषय आधी होऊद्या, त्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊ, असे सांगूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावरून ही बैठकच होऊ नये, असा काहींचा कट असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच बैठकीची हजेरी वहीही गायब करण्यात आली होती. माझी सही त्यावर होऊ नये, यासाठीच काहींची धडपड सुरू होती, असा आरोप त्यांनी केला.

साखर संचालकांवर चुकीचे आरोप करून तक्रार नोंदविण्यात आली होती; मात्र त्या एकतर्फी अहवालाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले. हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रवीष्ट असून, त्याची रीतसर कायदेशीर चौकशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असताना नियम धाब्यावर बसवून हे बेकायदेशीर आंदोलन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटू शकतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या या आंदोलनाचा विपरीत परिणाम कारखाना संकुलासह इतर संबंधित संस्थांवर होत आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी लोक बँकेतील आपल्या ठेवी काढू लागले आहेत, त्यामुळे हे आंदोलन आता थांबले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT