सांगली : सांगलीत मुळशी पॅटर्न स्टाईल हल्ला करत दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते याचा मंगळवार, दि. 11 रोजी खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांपैकी चौघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन त्यांच्या घरात तपासणी केली. दहशत मोडीत काढण्यासाठी बेड्यासह इंदिरानगर आणि वडर गल्ली परिसरात फिरवले.
दलित महासंघाचा उत्तम मोहिते याचा दि. 11 रोजी वाढदिवसादिवशीच 8 जणांनी निर्घृणपणे खून केला. यावेळी हल्ला करण्यासाठी आलेल्या शाहरूख शेख यालाही चाकू लागल्याने त्याचाही यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गण्या ऊर्फ गणेश सुरेश मोरे, सतीश विलास लोखंडे, अजय परशुराम घाडगे, योगेश ऊर्फ अभिजित राजाराम शिंदे, बन्या ऊर्फ पृथ्वी लोंढे यांना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीनांनाही ताब्यात घेतले आहे. यापैकी गण्या ऊर्फ गणेश मोरे, सतीश लोखंडे, अजय घाडगे आणि योगेश शिंदे या चौघांना घटनास्थळी बेड्यांसह फिरवण्यात आले. यावेळी संशयितांच्या इंदिरानगर झोपडपट्टी आणि वडर गल्लीतील घरांची तपासणी केली. गण्या मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याची इंदिरानगर परिसरात मोठी दहशत आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्याला बेड्या घालून परिसरात फिरवले. यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सागर होळकर, गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप पाटील, सतीश लिंबळे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक उपस्थित होते.
उत्तम मोहिते याच्या खुनातील संशयितांना गारपीर चौकात आणल्याचे समजतास उत्तम मोहिते याच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. संशयितांना परिसरात बेड्यांसह फिरवून पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मोहिते व संशयितांचे नातेवाईक पुन्हा समोरासमोर आले. एकमेकांना शिवीगाळ झाल्याने जोरदार वादावादीचा प्रकार घडला. पोलिस ठाण्याच्या दारातच हा गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप गेल्याने तणाव निवळला.
मोहिते याचा खून केल्यानंतर एक अल्पवयीन संशयित हल्लेखोर पसार होता. सांगली शहर पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान, अल्पवयीन गुन्हेगाराची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला ताब्यात घेतले.