सांगली : वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  
सांगली

Rohit Patil| टेंभूच्या पाण्याने घाटमाथ्याची तहान भागवा

आमदार रोहित पाटील; वारणाली येथे पाणीवाटपाच्या नियोजनासाठी आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : घाटमाथ्यावरील शेतीला टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ठोस आराखडा तयार करण्याची गरज आहे. घाटमाथ्यावरील प्रत्येक गावातील शेतीपर्यंत टेंभूचे पाणी पोहोचलेच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना आमदार रोहित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि पाणीवाटपाच्या नियोजनाबाबत शुक्रवारी वारणाली (सांगली) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत टेंभू योजनेच्या पाण्याचे प्रभावी वाटप कसे करता येईल, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. घाटमाथ्यावरील गावांना पाण्याच्या उपलब्धतेसाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. आमदार रोहित पाटील यांनी, प्रत्येक गावाचा स्वतंत्र विचार करून कोणत्या मार्गाने पाणी देता येईल, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केवळ कागदावर नियोजन न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी आवश्यक त्या तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य विकास हाक्के, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, घाटनांद्रेचे सरपंच अमर शिंदे, गर्जेवाडीचे माजी सरपंच प्रल्हाद हाक्के, दीपक चव्हाण, सुशांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, कार्यकारी अभियंता हर्षल यादव, कार्यकारी अभियंता अमोल गुरव, उपअभियंता विनायक खरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

घाटनांद्रे परिसरासाठी स्वतंत्र 'मास्टर प्लॅन' करा

घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, कुंडलिपूर, शेळकेवाडी, केरेवाडी यांसह घाटमाथ्यावरील शेतीला पाणी पोहोचवताना अनेक अडचणी येत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्पुरती मलमपट्टी न करता एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक 'मास्टर प्लॅन' तयार करा, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. यामध्ये पाण्याची उपलब्धता, पाणी वाहून नेण्याचे मार्ग, आवश्यक पायाभूत सुविधा व प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणारे क्षेत्र यांचा सखोल विचार करण्याची सूचना करण्यात आली.

आश्वासन देऊन शब्द फिरवू नका

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना पाणीप्रश्नावरून चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधींसमोर पाणी देण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी शब्द का फिरवता? शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांचे हेलपाटे का मारावे लागतात? असा थेट जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT