सांगली-जत : जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड (युनिट क्रमांक 4), तिप्पेहळ्ळी या कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नामफलक अज्ञातांनी बदलल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या आवारात अनधिकृत प्रवेश करून कमानीवरील ‘राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ हे नाव काढून ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा डिजिटल बोर्ड चिकटवला. यामुळे कमानीचे नुकसान झाले. घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. ही घटना शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबररोजी पहाटे घडल्याचे फिर्यादी प्रकाश गणपती पाटील (वय 59, रा. जत कारखाना कॉलनी, मूळ रा. इस्लामपूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 329 (3) व 324 (4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले की, कारखान्याच्या प्रवेशद्वारावर खोडसाळपणाने अज्ञाताने नामांतर केल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर कारखाना प्रशासनाने पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जत कारखान्यात अनेक शेतकर्यांनी किडुकमिडुक विकून शेअर्स घेतले. मात्र, तो असा कवडीमोल किमतीत विकला गेला, हे जतच्या जनतेला मान्य नाही. त्यातून लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे. त्यांनी राजारामबापू कारखान्याचे नाव बदलण्याचे धाडस केले आणि रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई शेतकर्यांनी लढायची ठरविली आहे. त्या दोन्ही लढाईत मी उभा राहणार आहे. जयंतराव सुसंस्कृत, संस्कारी व्यक्तिमत्त्व असेल तर त्यांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा करून द्यावा. अन्यथा आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
या प्रकरणाचा शरद पवारांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. शेतकर्यांच्या हितासाठी हा कारखाना चालविला जातोय. दुष्काळी भागातील शेतकर्यांसाठी हा कारखाना वरदान आहे. राजकीय फायद्यासाठी हा सर्व प्रकार केला जातोय, असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केला.