आष्पाक आत्तार
वारणावती : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात वसलेले उदगिरी पठार सध्या दुर्मीळ फुलांच्या फुलोत्सवाने नटले आहे. हे पठार म्हणजे निसर्गप्रेमींना आणि पर्यटकांना एक पर्वणीच आहे. यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
शाहूवाडी तालुक्यात येणारे हे पठार मिनी कास पठार म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे कुरडू, बुश कार्वी, उदी चिरायत यांसारख्या अनेक दुर्मीळ आणि स्थानिक वनस्पतींचे दर्शन होते. विशेष आकर्षण ठरत आहे, ती टोपली कारवी. चारी बाजूंनी निळसर-हिरव्या रंगात फुललेली ही कारवी पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पठारावर वार्याच्या झोतावर डुलणारी विविध जातींची फुले आणि शांत निसर्गसौंदर्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळातच ही फुले फुलतात. यंदा हवामान अनुकूल असल्याने फुलांचा बहर अधिक देखणा आणि समृद्ध आहे. हे पठार याआधी फारसे प्रसिद्ध नव्हते. मात्र अलीकडे सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांमधून याचे सौंदर्य जगासमोर येत आहे. त्यामुळे आता पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. चांदोली धरण, गुढे पाचगणी पठार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही या परिसरातील अन्य पर्यटनस्थळे आहेत. त्यातच उदगिरी पठारही भर घालते आहे.
सांगलीमार्गे : सांगली - शिराळा -कोकरूड - शेडगेवाडी - आरळा -शित्तूर - उदगिरी पठार (अंदाजे अंतर : 110 कि.मी.)
सातारामार्गे : सातारा - कराड - पाचवड फाटा - शेडगेवाडी - आरळा - शित्तूर- उदगिरी पठार (अंदाजे अंतर : 120 कि.मी.)
उदगिरी पठार पाहिल्यावर कास पठाराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. येथील बहुतांशी फुले कासप्रमाणेच आहेत. वातावरणही खूप आल्हाददायक आहे. शासनाने येथे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या परिसराचे संवर्धन करावे.रसिका कजरी, चिपळूण