ईश्वरपूर : वाळवा पंचायत समितीच्या सभापतिपदी उदयसिंह प्रतापराव पाटील व उपसभापतिपदी प्रकाश रघुनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या निवडी जाहीर केल्या. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गतवेळी वाळवा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे आ. जयंत पाटील गटाचे वर्चस्व होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाने 22 पैकी 14 जागा जिंकून वर्चस्व पुन्हा राखले, तर महायुतीला अवघ्या 8 जागा मिळाल्या. सभापती पद वाळवा की शिराळा विधानसभा मतदार संघात दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू होती. आ. जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.
राष्ट्रवादी (श. प.) कडून सभापती पदासाठी शिगावचे उदयसिंह पाटील आणि उपसभापती पदासाठी ऐतवडे खुर्दचे प्रकाश पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल होते. त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, गटनेते प्रकाश पाटील यांच्यासह नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती उदयसिंह पाटील म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांच्यामुळेच सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. विरोधकांनी अर्ज न भरता निवड बिनविरोध केली. त्यांचे आभार मानतो. सर्व नूतन सदस्यांना शिक्षण, आरोग्य, कृषी या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे.
दोन्ही मतदारसंघांना संधी...
गतवेळी आ. जयंत पाटील यांनी येडेमच्छिंद्र येथील सचिन हुलवान यांना व अडीच वर्षानंतर वाटेगावच्या शुभांगी पाटील यांना सभापतिपदी संधी दिली होती. यावेळी आ. पाटील यांनी शिगावचे उदयसिंह पाटील यांना सभापतिपदी व ऐतवडे खुर्द येथील प्रकाश पाटील यांना उपसभापती पदाची संधी देऊन ईश्वरपूर-शिराळा या दोन्ही मतदारसंघांचा समतोल साधला. आता अडीच वर्षानंतर सभापतिपदी शिराळा मतदारसंघाला नक्की संधी मिळेल, अशी चर्चा निवडीवेळी होती.