सांगली ः येथील शंभरफुटी रस्त्यावर भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय 38, रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) याचा कोयत्याने अठरा वार करून खून करणार्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. इनाम धामणी (ता. मिरज) येथे सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. वडिलांच्या खुनाचा बदला व अनैतिक संबंधाच्या कारणावरून कांबळेचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. मुजाहिद फिरोज ऊर्फ बडे शेख (वय 24) व जय सूरज पाटील (21, दोघे रा. इंदिरानगर, मालगाव रोड, मिरज, सध्या रा. साई मंदिराजवळ, संजयनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, महेश कांबळे हा भाजी विक्रेता होता. दि. 5 रोजी सकाळी तो शंभरफुटी रस्त्यावरील बाजारात भाजी विक्रीसाठी आला होता. संशयित मुजाहिद व जय दोघेही त्याच्या मागावर होते. यादरम्यान, बसस्थानकाकडे नाष्टा करण्यासाठी निघालेला महेश वाटेत लघुशंकेसाठी थांबला आणि याचवेळी दोघांनी डाव साधला. कोयता, एडक्याने महेशवर दोघांनी हल्ला केला. महेश गटारीत पडला असतानाही दोघेजण त्याच्यावर सपासप वार करत होते. ही घटना परिसरातील नागरिक, भाजी विक्रेत्यांनी पाहिली. ते घटनास्थळी धावले. तोवर दोघेही हत्यारे नाचवत, नागरिकांच्या दिशेने दगड फेकत दुचाकीवरून पसार झाले होते.
महेशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजय मोरे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या होत्या. शहर पोलिस व एलसीबीची दोन पथके संशयितांचा शोध घेत होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार, हवालदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना मुजाहिद व जय हे इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने महामार्गावर सापळा रचला. हे दोघे बसमधून उतरून पुलाखाली अडोशाला थांबले दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाल केली. पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळू लागले. पण पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. संशयितांनी खुनाची कबुली दिली आहे.
महेश कांबळे याने चार वर्षापूर्वी संशयित मुजाहिद याचे वडील फिरोज ऊर्फ बडे शेख यांचा भाजीविक्रीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून खून केला होता. या खुनात कांबळे याला पोलिसांनी अटक केली होती. दोन वर्षापूर्वी तो जामिनावर बाहेर आला. त्यात संशयिताच्या नात्यातील महिलेशी कांबळेचे अनैतिक संबंध होते. फिरोज शेख यांनी महेश याच्याकडून 60 हजार रुपये घेतले होते. या पैशासाठी तो मुजाहिदला त्रास देत होता. वडिलांच्या खुनाचा रागही मुजाहिदच्या मनात होता. अनैतिक संबंध, वडिलांचा खून आणि पैशासाठी सुरू असलेल्या त्रासातून मुजाहिदने मित्र जय याच्यासोबत महेशच्या खुनाचा कट रचला. महेेश पहाटे भाजी विक्रीसाठी जात असल्याची माहिती त्याला होती. त्यातूनच त्याने दि. 5 रोजी महेशवर कोयत्याने वार करून खून केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
मुजाहिद व त्याच्या मित्राने महेश कांबळे याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. दोघांच्या शोधासाठी शहर पोलिसांकडील गुन्हे प्रकटीकरण शाखा व एलसीबीची दोन पथके रवाना करण्यात आली होती. खुनानंतर दोघेही कर्नाटकात गेल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथक कर्नाटकात त्यांच्या मागावर होते. दरम्यान, कर्नाटकातून दोघे गोव्याला गेले. तेथून ते बसने परत सांगलीकडे येत होते. अखेर इनाम धामणी येथे महामार्गावर दोघेजण बसमधून उतरले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
महेश कांबळे खुनातील दोघांनाही शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे हत्यार सापडलेले नाही. ते जप्त करायचे आहे. पसार झाल्यानंतर ते कुणाच्या संपर्कात होते, त्यांना कोणी मदत केली, याची माहिती घेतली जात आहे. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. वडिलांचा खून, अनैतिक संबंधातून कांबळे याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. -प्रणिल गिल्डा, पोलिस उपअधीक्षक, सांगली