फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू 
सांगली

Sangli News : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू

खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथे एका शोभेची दारू (फटाके) बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. ही घटना सोमवार, दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता घडली. या भीषण दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये कारखाना मालकाचा मुलगा अल्ताफ मन्सूर मुल्ला (वय 24) आणि जावई अमीन उमर मुलाणी (35, रा. चिंचणी अंबक) यांचा समावेश आहे. याप्रकरणी कारखाना मालक मन्सूर मुल्ला याच्यावर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनास्थळ व विटा पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, मन्सूर मुल्ला यांचा भाळवणी येथे मुल्ला फायर वर्क्स नावाचा शोभेची दारू (फटाके) बनविण्याचा कारखाना आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज 5 किलोमीटर परिसरापर्यंत ऐकू गेला. परिसरातील जमीन भूकंपासारखी हादरली. अनेक घरांच्या आणि वाहनांच्या काचांना तडे गेले, तर घरातील भांडीही खाली पडली. स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उंचपर्यंत दिसू लागले.

यावेळी काहींनी विटा, तासगाव, पलूस येथील अग्निशामक दल तसेच विटा पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आगीचा भडका कहीसा कमी झाला होता. याचवेळी कारखान्यातून अमीन मुल्ला पळत बाहेर आला. ‌‘आत अल्ताफ अडकलाय, त्याला बाहेर काढा‌’, असे म्हणत तो बेशुद्ध पडला. यानंतर काहींनी कारखान्याकडे धाव घेतली. स्फोटामुळे पत्रे, अँगल्स तसेच विटा, माती आणि अन्य वस्तू अल्ताफच्या अंगावर कोसळल्या होत्या. काहींनी जवळच असलेला जेसीबी बोलावून ढिगारा बाजूला केला. दरम्यान, विटा नगरपरिषद, तसेच क्रांती कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली व गंभीर जखमी झालेल्या अल्ताफला बाहेर काढले.जखमी आफताब व अमीन या दोघांनाही आपत्कालीन रुग्णवाहिकेतून विटा व तेथून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

विनापरवाना कारखाना;मालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी संदीप संपत लाड यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाळवणी येथील गट क्र. 40/3 मधील पत्र्याच्या खोलीत हा कारखाना विनापरवाना सुरू असल्याचे समोर आले आहे. शोभेची दारू बनवण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण नसताना, तसेच सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत मालक मन्सूर कमरुद्दीन मुल्ला याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌‘अल्ताफला वाचवा...‌’ ‌‘अमीनचे काय झाले?‌’

स्फोटानंतर आगीच्या झळा कमी होताच अमीन पळत कारखान्याबाहेर आला. ‌‘आत अल्ताफ अडकलाय, त्याला वाचवा‌’, म्हणत तो बेशुध्द पडला. आणखी एक आत अडकल्याचे समजताच उपस्थितांनी मदतकार्य सुरू केले व गंभीर भाजलेल्या अल्ताफला बाहेर काढले. अर्धवट ग्लानीत असलेल्या अल्ताफने मदत करणाऱ्यांना कण्हतच ‌‘अमीन कुठाय? अमीनचं काय झालं?‌’ असे विचारले. या दोघांना एकमेकांप्रति असलेल्या काळजीने उपस्थित हेलावून गेले.

ऊस वाचवला...

आग लागलेल्या कारखान्याच्या आजुबाजूला उसाची शेती आहे. आगीच्या झळा या उसापर्यंत पसरल्या होत्या. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणत हा ऊस वाचवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT