महंमद कुमसगी व दीपक अर्जुन वडर pudhari photo
सांगली

Truck tempo accident | ट्रकची टेम्पोस धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Fatal collision: जत-विजयपूर रस्त्यावर मुचंडीजवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : जत-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी (ता. जत) गावाजवळ मालवाहू टेम्पो आणि आयशर ट्रक या वाहनांची समोरासमोर धडक होऊन टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर आयशरचालक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवार, दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता कुलांगी वस्तीसमोर घडली.

महंमद कुमसगी (वय 22, सध्या रा. विजयपूर, मूळ रा. कोकटनूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर) आणि दीपक अर्जुन वडर (23, रा. पडनूर, ता. इंडी, जि. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत, तर अपघातात आयशरचा चालक बसवराज मुंजेनावर (45, रा. विजयपूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जत पोलिस व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी ओढ्यानजीक कुलांगी वस्तीसमोर हा अपघात घडला. टेम्पो (क्र. केए 63 ए 3190) जत येथील एका कंपनीचा माल खाली करून विजयपूरकडे निघाला होता, तर आयशर (क्र. केए 28 डी 0629) बेदाणा भरून विजयपूरहून तासगावकडे निघाला होती. मुचंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पुढील वाहनाच्या बाजूने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोने समोरून येणार्‍या आयशरला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, टेम्पोमधील दोघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच जत पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी हलवण्यात आले, तर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT