येडेनिपाणी : पुढारी वृत्तसेवा
येथे विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिल्याने अल्ताफ सिकंदर मुल्ला (वय 40, रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) या एकाचा मृत्यू झाला, तर अन्य 11 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री पुणे - बंगळुरू महामार्गावर इटकरे फाट्याजवळ झाला. ट्रकचालकाने पलायन केले. अमोल बाळासाहेब पाटील (वय 35), शंकर विलास पाटील (48), विनायक बाळासाहेब पाटील (21), संदीप सुभाष पाटील (34), ऋषिकेश बजरंग पाटील (32), रोहन बाळासाहेब पाटील (31), शिवराज दत्तात्रय पाटील (25), शंकर निवृत्ती तेवरे (26), संकेत सुनील जोशी (19), महेश बाबासाहेब पाटील (35), मनोज शिवाजी पाटील (38, सर्व रा. येडेनिपाणी) अशी जखमींची नावे आहेत.
रविवारी येडेनिपाणी येथील क्रांतिवीर मंडळाची विसर्जन मिरवणूक होती. रात्री मिरवणूक संपल्यानंतर 10 ते 15 कार्यकर्ते विसर्जन करण्यासाठी ट्रॅक्टर (केए 71 टी 0925)मधून येलूर येथील तलावाकडे निघाले होते. अल्ताफ मुल्ला ट्रॅक्टर चालवत होते. महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना येलूर ते इटकरे गावादरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मागून आलेल्या ट्रकने (एमएच 12 एन. एक्स. 7332) त्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टरचालक अल्ताफ रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॉलीतील 10 ते 12 कार्यकर्ते रस्त्याच्या दुभाजकावर पडल्याने जखमी झाले.
ट्रक चालकाने काही अंतरावर ट्रक सोडून पलायन केले. कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, महेश साळुंखे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मिळेल त्या वाहनांनी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात नेले. ट्रकचालकावर गुन्हा दाखल झााला आहे. रोहन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता, की ट्रॅक्टर ट्रॉलीपासून वेगळा होऊन सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टरचे एक चाक तुटून पडले. ट्रॅक्टर-ट्रॉलीतील मूर्ती मात्र सुरक्षित होती. अपघातानंतर दुसर्या वाहनातून मूर्ती नेऊन विसर्जन केले.
मृत अल्ताफ यांच्या घरची स्थिती बेताची आहे. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यासह अनेक मुस्लिम तरुण या मंडळाच्या गणेशोत्सवात सक्रिय असायचे. सायंकाळपासून सुरू झालेल्या त् मिरवणुकीत अल्ताफ ट्रॅक्टर चालवत होते. ईददिवशी त्यांचा मृत्यू झाला. गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे वृध्द आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.