मिरज : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले आहे. दिल्ली व उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची रेल्वे सुरक्षा दलाकडून श्वान पथकामार्फत कसून तपासणी केली जात आहे. तसेच प्रवाशांच्या बॅगांचीही तपासणी केली जात आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभर हायअलर्ट देण्यात आला आहे. सर्वच तपास यंत्रणा सध्या सतर्क आहेत. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलानेही देशभरात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर लक्ष ठेवले आहे. विशेषत: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची कसून तपासणी केली जात आहे. मिरजेतून उत्तर आणि दक्षिण भारतात अनेक रेल्वेगाड्या धावतात. दिल्लीतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने लक्ष केंद्रित केले आहे. दिल्ली व उत्तर भारतातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची श्वान पथकामार्फत तपासणी सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षालय, रेल्वे वाहनतळ, सामान घर अशा सर्व ठिकाणी श्वान पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्थानकात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.