कडेगाव : बोंबाळेवाडी (शाळगाव, ता. कडेगाव) एमआयडीसी येथील मॅनमार फर्टिलायझर प्रा. लिमिटेड कंपनीत गुरुवारी विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत गुरुवारी एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी आणखी 2 कामगारांचा मृत्यू झाला असून, 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुचिता राजेश उथळे (वय 45, रा. येतगाव, ता. कडेगाव), नीलम मारुती रेठरेकर (35, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा) आणि किशोर तात्यासोा सापकर (40, रा. बोंबाळेवाडी, ता. कडेगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गळती झालेल्या वायूचा परिणाम आसपासच्या वस्तीवर आणि गावांवरही झाला आहे. नागरिकांना अजूनही उलट्या होणे, डोळ्यात जळजळ आणि श्वास कोंडणे असा त्रास होत आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता मॅनमार कंपनीतील टाकीतून विषारी वायूची गळती झाली. त्यामुळे या कंपनीतील तसेच एमआयडीसी आणि जवळच्या वस्तीवरील लोकांना त्रास सुरू झाला. अनेकजण बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत सुचिता उथळे यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला, तर नीलम रेठरेकर आणि किशोर सापकर यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 9 जण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच कराड येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी उपाययोजनांबाबत प्रशासनास निर्देश दिले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलली.
बोंबाळेवाडी एमआयडीसी दुर्घटनेत कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या बोंबाळेवाडी, शाळगाव येथील ग्रामस्थांनी एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमध्ये जाऊन, या कंपन्या तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ग्रामस्थांची आक्रमकता पाहून येथील उद्योजकांनी शुक्रवारी सर्व कंपन्या बंद ठेवल्या.
गुरुवारी घडलेल्या घटनेनंतर वायुगळतीचा उग्र वास शुक्रवारी दिवसभर कायम होता. या दुर्घटनेनंतर शाळगाव, बोंबाळेवाडी आदी परिसरातील लोकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात झाला, तर अनेक लोक किरकोळ त्रासामुळे कडेगाव व जवळच्या रुग्णालयांत उपचार घेताना दिसून आले.