सांगली

जत पूर्व भागाला तुबची बबलेश्वरमधून पाणी द्यावे : आमदार सावंत यांची हिवाळी अधिवेशनात मागणी

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : सध्या जत तालुक्याला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू आहे. परंतु म्हैशाळ योजनेला संबंधित शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत आहेत .तरी शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून टंचाईमधून सवलत द्यावी. तसेच पूर्व भागाला कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याची मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.

आ. सावंत म्हणाले, जत तालुक्यात नेहमीच आवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवते. अशा प्रसंगी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे.आजमितीस कर्नाटक सरकारकडे महाराष्ट्र राज्याचे पावणे आठ टीएमसी पाणी शिल्लक आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन शिल्लक पाणी तुबची बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागाला देण्याची पूर्तता करावी. जेणेकरून अत्यंत कमी खर्चात व नैसर्गिक प्रवाहाने अगदी कमीत कमी वेळात पाणी मिळू शकते.तरी तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यात यावे.तसेच सध्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. दरम्यान म्हैशाळ उपसा सिंचन योजनेची रब्बी आवर्तन सुरू आहे परंतु याकरीता पाण्याचा कर संबंधित शेतकऱ्यांना भरावा लागत आहे .तरी टंचाई निधीतून पाण्याचे बिल माफ करावे. ओढे, नाले तलावे पाण्याची स्रोत भरून द्यावेत. दुष्काळग्रस्तांना सवलत द्यावी अशी मागणी आमदार सावंत यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे.

आमदार सावंत यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जत पूर्व भागातील गावांना तुबची बबलेश्र्वर योजनेचे पाणी मिळणेबाबत कर्नाटक शासनाशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन विधानसभा सभागृहात दिले. तसेच म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी टंचाई निधीतून भरू असेही सांगितले.

SCROLL FOR NEXT