सांगली : पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाचे आणि पाकिस्तानला शिकवलेल्या धड्याचे स्मरण करत, सांगली शहरात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. देशभक्तीच्या वातावरणात राष्ट्रप्रेमी सांगलीकरांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिक व अनेक माजी सैनिकांच्या उपस्थितीने ही यात्रा अधिक प्रेरणादायी ठरली.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला. ‘सैनिकांच्या सन्मानार्थ हर भारतीय मैदानात’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदेमातरम्’, ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. भारतीय सैन्यदलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक आणि तिरंगा ध्वज हातात घेऊन नागरिक मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी झाले होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, पाकिस्तानात घुसून भ्याड दहशतवादी कृत्ये करणार्यांना भारतीय सैन्यदलाने धडा शिकवला आहे. भारतीय सैनिकांनी दाखवलेले शौर्य अतुलनीय आहे. त्यामुळे आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणीही करणार नाही. हा आताचा मजबूत भारत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाने ही उंची गाठली आहे. संपूर्ण देश आपल्या पराक्रमी आणि कर्तव्यदक्ष सैन्यदलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भाजपाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्रिकोणी बागेतील शहीद स्मारकाजवळ यात्रेचा समारोप झाला.
या यात्रेत भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेविका भारती दिगडे, पांडुरंग कोरे, अविनाश मोहिते, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील यांच्यासह नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.