वारणावती : चांदोलीचे धरण पोहून पाटणच्या जंगल क्षेत्रात पोहोचलेली तारा वाघीण शनिवारी पहाटेच्या सुमारास शिराळा तालुक्यातील आरळा परिसरातील बेर्डेवाडी, कोकणेवाडी, जळकेवाडी परिसरात वावरताना अनेकांना दिसली. वन्यजीव विभागाच्या म्हणण्यानुसार तीन तासासाठी ती या परिसरात दिसली. त्यानंतर सध्या तिचे लोकेशन पाटण तालुक्यातील घोटील कचनी परिसरात आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेली व गेले पंधरा दिवस पाटण, ढेबेवाडी अभयारण्यात संचार करत असलेली तारा वाघीण मागील आठवड्यात माइंडेवाडी-पाटण रस्त्यावर प्रवाशांना दिसली होती. प्रवाशांनी तिचा वावर व्हिडीओमध्ये कैद केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
चांदोलीच्या दक्षिण बाजूला उदगीर परिसरात बफर क्षेत्रात चंदाचा वावर होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता उत्तरेला ताराच्या वावराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. चांदोली धरण पोहून गेल्यानंतर तारा पुन्हा सोनवडे, आरळा परिसरातील जळकेवाडी, कोकणेवाडी, बेर्डेवाडी परिसरात वावरताना दिसली.
बफर क्षेत्रातील या गावांमध्ये तारा आल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृती केली. जनावरे रानात सोडू नका, बाहेर एकटे फिरू नका, मोटारीतून प्रवास करताना काचा बंद ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या. ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या तारा व चंदा या दोन वाघिणींना चांदोली अभयारण्य परिसरात येऊन दोन महिने उलटत आले आहेत. दोन्ही वाघिणी सुरुवातीला कोअर झोनमध्ये, त्यानंतर बफर झोनमध्ये वावरताना दिसल्या. सध्या चंदा कोअर झोनमध्ये स्थिरावली असून तारा मात्र बफर झोनमध्ये आहे.
या दोन्ही वाघिणींच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आली आहे. सॅटेलाइट टेलिमेट्री व्हीएचएफ ट्रेकिंगच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींवर वन्यजीव विभागाकडून 24 तास लक्ष ठेवले जात आहे. तारा वाघिणीने चांदोली परिसरात आल्यापासून अभयारण्याच्या कोअर क्षेत्रात 50 किलोमीटरहून अधिक अंतराची भ्रमंती केली आहे. तिच्या भ्रमंतीवर भारतीय वन्यजीव संस्थेच्या सदस्यांचे पथक लक्ष ठेवून आहे. या दोन्ही वाघिणी कोअर क्षेत्रामध्ये लवकरच स्थिरावतील. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय वन्यजीव संस्था, तसेच वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.