वारणावती : ताडोबातून आणलेली तारा वाघीण एसटीआरटी-04 (सह्याद्री टायगर रिझर्व्हर टायगर-04) पंधरवड्यापूर्वी चांदोलीच्या नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपूर्वी ती कोअर झोनमधून बफर झोनमध्ये मुक्तसंचार करत होती. वन्य जीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पर्यटकांनी तिचा मुक्त संचार कॅमेऱ्यात चित्रीत केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, परिसरात बफर झोनमध्ये पहिल्यांदाच वाघाचे दर्शन झाल्यामुळे आनंद आणि उत्साह तितकेच भीतीचे वातावरण आहे.
पंधरा दिवसापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून तीन वर्षाची चंदा नावाची वाघीण चांदोलीत आणली होती. दोन दिवस येथील नियंत्रित पिंजऱ्यात ठेवल्यानंतर ती नैसर्गिक जंगलात निघून गेली. चार दिवसांपूर्वी उदगिरी येथील बफर झोनमध्ये असणाऱ्या देवालय परिसरात काही पर्यटकांना ती नजरेस पडली. त्यांनी तिचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही तिचा संचार पाहायला मिळाला. त्यांनीही तिचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
कोअर झोन म्हणजे काय?
व्याघ्र प्रकल्पाचे मध्यवर्ती, अभेद्य क्षेत्र म्हणजे कोअर झोन. हे क्षेत्र कमीत कमी मानवी हस्तक्षेपांसह वाघांच्या संवर्धनासाठी काटेकोरपणे संरक्षित आहे. वन्यजिवांच्या नैसर्गिक जीवनास पूरक वातावरण असलेले हे क्षेत्र अतिसंवेदनशील मानले जाते.
बफर झोन म्हणजे काय?
कोअर झोनच्या आजुबाजूचे बहुउपयोगी क्षेत्र, जिथे वन्यजीव संवर्धनासोबतच नियंत्रित पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन आणि शाश्वत संसाधनांचा वापर, यासारख्या मानवी हस्तक्षेपास परवानगी आहे. बफर झोन हा गाभा क्षेत्रासाठी अर्थात कोअर झोनसाठी संरक्षक अडथळा म्हणून काम करतो आणि वन्यजीव आणि मानवी गरजा संतुलित करण्यास मदत करतो.