Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीत वाघ आला, सुरक्षेचे काय? Pudhari Photo
सांगली

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीत वाघ आला, सुरक्षेचे काय?

आणखी सात वाघ आणणार; 12 वर्षे नाही विशेष व्याघ्र संरक्षण दल

पुढारी वृत्तसेवा
आष्पाक आत्तार

वारणावती : केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ताडोबातील चंदा वाघीण चांदोलीत दाखलही झाली. तिच्यापाठोपाठ अजून सात वाघांचं आगमन होणार आहे. मात्र वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे विशेष व्याघ्र संरक्षण दल (एस.टी.पी.एफ... स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स) येथे कार्यरत नाही. त्यामुळे वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

पंधरा दिवसांपूर्वी चांदोलीच्या जंगलात सोडलेली ताडोबातील ‌‘चंदा‌’ वाघीण सह्याद्रीत ‌‘तारा‌’ नावाने ओळखली जाऊ लागली. चांदोलीच्या कोअर झोनमध्ये सोडलेल्या या वाघिणीचा चार दिवसापूर्वी बफर झोनमध्ये मुक्तसंचार सुरू होता. पर्यटक तसेच वन्यजीव विभागाने तिचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. नागरिकांमध्ये भीती पसरू नये म्हणून वन्यजीव विभागाने रेडिओ कॉलरच्या माध्यमातून 24 तास ती निरीक्षणात असल्याचे सांगितले. ती निरीक्षणात असली तरी, आवश्यक असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे कार्यरत नसल्यामुळे वाघिणीच्या मुक्त संचारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

चांदोली व कोयना अभयारण्यातील 690.63 चौरस किलोमीटर क्षेत्र शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. या प्रकल्प क्षेत्रात 2018 मध्ये एका वाघाची छबी कॅमेऱ्यात टिपली होती. सध्या ताडोबातून आणलेल्या वाघिणीसह एकूण चार वाघ प्रकल्प क्षेत्रात आहेत.

स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्ससाठी बारा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर सर्व व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात असे दल आहे. हे विशेष संरक्षण दल कार्यरत नसल्यामुळे वन्यजीव कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. आता पुनर्वसनानंतर सह्याद्रीत वाघांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे पुनर्वसन केलेल्या वाघांची सुरक्षा वाऱ्यावरच राहणार का? खरे तर पुनर्वसनाआधी त्यांच्या संरक्षणाची खबरदारी शासनाने घ्यायला हवी.

भीतीचे वातावरण

अगोदरच बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यातच वाघांच्या आगमनामुळे त्यात वाढ होणार का?, असा प्रश्न आहे. शिवाय बफर झोनमध्ये बिबट्यांप्रमाणे सध्या तारा वाघिणीचा सुरू असणारा मुक्तसंचार आणि भविष्यात सोडण्यात येणारे वाघ, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एस.टी.पी.एफ. कार्यरत होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे प्रकल्पाचे तसेच वन्यजिवांचे रक्षण होईल. शंभरहून अधिक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल. शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष दिले, तर बारा वर्षांपासून केवळ प्रतीक्षेत असणारे हे दल कार्यरत होईल.
- रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT