रेशन  file
सांगली

रेशनवर आता एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य

जूनपासून अंमलबजावणी; गोदाम, दुकानदारांकडे धान्यासाठी अपुरी जागा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आगामी पावसाळा, पूर आपत्कालीन स्थितीत रेशन वाटपासाठी शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात रेशन दुकान संघटना आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य वितरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. पण आता तीन महिन्यांचे धान्य कोठे ठेवायचे? असा प्रश्न रेशन दुकानदारांपुढे तर आला आहेच, शिवाय इतकी मोठी गोदामे प्रशासनाकडेही नसल्यामुळे साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तीन महिन्यांचे रेशनवरील धान्य देण्याची उपाययोजना केली आहे. जिल्हा पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार संघटनांना राज्य शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सवरून तशा सूचनाही केल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. सांगली जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार 598 आहे. या कार्डधारकांना महिन्याला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. त्याचबरोबर जिल्ह्यात 3 लाख 99 हजार 905 प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारक आहेत. यातील कार्डधारकांना माणसी 2 किलो गहू, तर 3 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. एकूण 4 लाख 30 हजार 503 शिधापत्रिका धारकांना रेशनवरील धान्याचा लाभ देण्यात येतो. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी अशी दक्षता घेण्यात आली होती.

आता रेशन दुकानदारांकडेच इतके धान्य एकत्रित ठेवण्यासाठी जागा नाही. दुसर्‍या बाजूला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने गोदामे उभारण्यात आली आहेत. ही गोदामेही एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य साठवण्याइतकी मोठी नाहीत. शहरामध्ये मिरज येथील रेल्वे गोदामामधून धान्य थेट दुकानांना पाठवण्यात येते. ग्रामीण भागातील धान्य मात्र तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या गोदामामध्ये साठवणूक करून वितरित करण्यात येते. रेशन दुकानदारांंनी तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी न देता टप्प्या-टप्प्याने द्यावे, अशी मागणी केली आहे.

एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य साठवण्याची क्षमता रेशन दुकानदारांकडे नाही. त्यामुळे एका महिन्याच्या वितरणानंतर दुसर्‍या महिन्याचे धान्य तत्काळ द्यावे, अशी आमची मागणी आहे. टप्प्या-टप्याने धान्य दिल्यास सोयीचे होणार आहे.
दीपक उपाध्ये, अध्यक्ष, रेशन धान्य दुकान संघटना, सांगली जिल्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT