हरिपूर : ‘मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबीयांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील दोन व सांगली येथील एक, अशा एकूण तीन रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेच्या तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या 25 मिनिटात कोल्हापूरला, तिथून विशेष विमानाने अवघ्या दीड तासात नाशिकला पोहोचले, तर रुग्णवाहिकेतून मूत्रपिंड नाशिकला ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना केले.
हरिपूर (ता. मिरज) येथील 69 वर्षीय दीपक धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्त्रावामुळे मंगळवारी, दि. 16 डिसेंबर रोजी उष:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबीयांनी दु:खावेगाला आवर घालत त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. पत्नी दीपा, कन्या डॉ. श्रेया, चिरंजीव अभिनंदन यांनी इतर कुटुंबीयांशी चर्चा करत अवयव दानाचा निर्णय घेत, दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला.
त्यानुसार दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन डोळे आणि त्वचा दान करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना रुग्णालय प्रशासनाने दिली. अवयव दानाच्या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी तत्परतेने आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आवश्यक प्रशासकीय पाठबळ दिले.
यावेळी दीपक धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या अवयवांचे दान करण्याचा धर्माधिकारी कुटुंबीयांचा निर्णय अवयव दानाच्या चळवळीला बळ देणारा आहे, यामुळे समाजात अधिक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला. नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम शुक्रवारी सकाळी सांगलीला दाखल झाली. त्यांनी जवळपास दोन तासात संबंधिताचे अवयव सुस्थितीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर या रुग्णालयातून नाशिक येथे पोहोचवण्यासाठी यकृत नेण्यासाठी विशेष विमान व मूत्रपिंड पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला.
ग्रीन कॉरिडॉरमुळे सांगलीतून रुग्णवाहिकेने अवघ्या 25 मिनिटात कोल्हापुरात आणि तेथून विशेष विमानाने अवघ्या दीड तासात यकृत नाशिकला नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयव दानातील यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात विनाअडथळा व गतीने नेण्यासाठी मदत झाली. दीपक धर्माधिकारी यांच्या दुसऱ्या मूत्रपिंडाचे उषःकाल रुग्णालयातीलच दुसऱ्या एका रुग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच, डोळ्यांचा कॉर्निया अनुराधा आय हॉस्पिटल आणि त्वचा सुश्रूत प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल येथे नेण्यात आले असून आवश्यकतेनुसार प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमात उषःकाल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारीख, डॉ. मकरंद खोचीकर, डॉ. आनंद मालाणी, डॉ. बिपीन मुंजाप्पा यांच्यासह वैद्यकीय पथकाच्या अचूक व वेगवान समन्वयाने हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले. दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य जरी संपले असले तरी, त्यांच्या अवयव दानामुळे दोन जिवांना नवे आयुष्य लाभले. ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवणारी ठरली आहे.