सांगली : माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासंदर्भात बैठक झाली. यावेळी उपस्थित माजी मंत्री अजितराव घोरपडे, निशिकांत पाटील आदी.  Pudhari File Photo
सांगली

तीन माजी आमदार जाणार राष्ट्रवादीत

विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा आठवड्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील तीन माजी आमदारांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. मिरजेत शनिवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अजित पवार यांनी या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यात मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे.

भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या तीन ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश ठरला आहे. महिन्याभरापूर्वी या माजी आमदारांची बैठक झाली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर या नेत्यांचे एकमत झाले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले होते. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन व अजित पवार यांच्या मुलाचा साखरपुडा, त्यानंतर पक्षप्रवेशावर चर्चा झाली आहे. अजित पवार यांनी नुकताच या पक्षप्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी या माजी आमदारांशी चर्चा केली असून पुढील आठवड्यात मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. मिरजेत झालेल्या बैठकीत माजी आमदारांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. याबाबत मतदार संघात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

माजी आमदार विलासराव जगताप यांना विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने भाजपमधून निलंबित करण्यात आले. जगताप यांनी लोकसभेलाही भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. पक्षाने त्यांना त्यावेळी अभय दिले, मात्र पुन्हा विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला साथ दिली नाही. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. पण जगताप यांनी आपण कारवाईपूर्वीच राजीनामा दिल्याचे सांगितले होते. माजी आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपसोबत होते. मात्र त्यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हेही भाजपमध्ये होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी खानापूर - आटपाडी मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. देशमुख हे मूळचे शरद पवार यांचे समर्थक होते. त्यांच्या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती. आता ते अजित पवारांसोबत जाणार आहेत. माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी लोकसभेला भाजपच्या विरोधात अपक्षाला साथ दिली. विधानसभेला मात्र ते महायुतीसोबत होते. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला साथ दिली होती. त्याचवेळी त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश निश्चित झाला होता.

विकासाला गती देण्यासाठी एकमताने निर्णय

यावेळी विलासराव जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत दुसरी बैठक शनिवारी मिरजेत पार पडली. यावेळी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करण्याचा आमचा अंतिम निर्णय झाला. खासदार सुनील तटकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. पक्षप्रवेश पुढील आठवड्यात मुंबईत होणार आहेत. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT