सांगली ः येथील रेल्वे स्टेशनजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. पथकाने तीन संशयितांना अटक करून 900 नशेच्या गोळ्या जप्त केल्या. संशयितांनी मुंबईतून गोळ्या खरेदी करून त्या विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
रवी सिद्राम पवार (वय 36), रोहन साहेबराव पवार (21, दोघे, रा. रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, माकडवाले गल्ली), आर्यन बजरंग कांबळे (22, रा. शांतीनगर, अंगणवाडीजवळ सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लू पवार (रा. कुर्ला पाण्याच्या पाईपलाईन झोपडपट्टी, मुंबई) हा पसार झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील नशेखोरीला आळा घालण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांना दिले होते. त्यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते. पथकातील सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे, हेड कॉन्टेबल आमसिद्ध खोत, रोहन घस्ते, सुमीत सूर्यवंशी यांना रवी पवार हा सांगली रेल्वे स्टेशनजवळीली वेट ब्रिजच्या बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने नायब तहसिदार विनोदकुमार चव्हाण, अन्न व औषध प्रशासनाच्या जयश्री सवदत्ती यांच्यासह संशयितावर वॉच ठेवला. यावेळी रवी पवार हा हातात पिशवी घेऊन येत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन झढती घेतली असता त्याच्याकडे नशेच्या गोळ्यांची 60 पाकिटे मिळून आली. अधिक तपास सुरू आहे.
रवी पवार याने नातेवाईक प्रकाश पवार (मुंबई) याच्याकडून गोळ्या आणल्याची कबुली दिली. तसेच जादा दराने विक्रीसाठी कुरियर बॉय म्हणून त्याचा पुतण्या रोहन व आर्यन कांबळे काम करीत असल्याचे सांगितले. पथकाने रोहन व आर्यन या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचाही सहभाग निष्पन्न झाला. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावण्यात आली.